
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्य सरकारकडून पालिकेला मिळणाऱ्याजकात भरपाईच्या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी पालिकेत येणे झाले होते. त्यावेळचे वातावरण आणि पर्यावरण वेगळे होते. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या वातावरणात जमीन-अस्मानाचा फरक आहे. वाघांबरोबरच वाघप्रेमींची संख्याही वाढतेय, अशी राजकीय फटकेबाजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. आता शिवसेना आणि भाजप मिळून केवळ मुंबईतच नाही, तर राज्यात व देशात चांगले काम करू असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महापालिका राज्य सरकारच्या सहकार्याने गोरेगावच्या आरे कॉलनीत 120 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पालिका आणि वन विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. काही वर्षांपूर्वी युतीच्या जाहीरनाम्यात गोरेगावच्या आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारणार असल्याचे आश्वासन मुंबईकरांना दिले होते. ते आता पूर्ण होत असल्यामुळे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या आशीर्वादानेच आपण निवडणुका जिंकत असतो. ‘वन विभाग आणि मन विभागा’च्या सहकार्यामुळेच अशी कामे शक्य होतात, असे प्रतिपादनही त्यांनी केले. मुंबईकर आणि देश-विदेशातून येणाऱ्यापर्यटकांसाठी सिंगापूरच्या धर्तीवर उभारले जाणारे हे प्राणी संग्रहालय समाधान देणारे ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच घेतलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करताना या कामाचा कायस्वरूपी ठसा उमटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभेत वाघांची संख्या वाढणार – सुधीर मुनगंटीवार
युतीचे सरकार यायच्या आधी राज्यात वाघांची संख्या 204 होती. ती आता 250 वर गेली आहे. तर बछडय़ांची संख्या 101 वरून 250 गेली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीतही विधानसभेत वाघांची संख्या वाढेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबई सुंदर करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. मुंबईच्या विकासासाठी कितीही निधी लागला तरी पैसे कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
पाण्यावर राजकारण करू नये
नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद केल्याचा आरोप केला जात असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘पाणी ही अशी गोष्ट आहे की आपण त्याची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे असणारे पाणी आपण जपून वापरले पाहिजे. दुष्काळ असणाऱ्याभागात राज्य सरकारच्या वतीने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. त्यामुळे पाण्यावरून कुणी राजकारण करू नये’.
प्राणीशास्त्राचे विद्यापीठ
आरे कॉलनीमध्ये उभारण्यात येणाऱ्याप्राणीसंग्रहालयात दुर्मिळ प्राणी, पक्षी-सरपटणारे प्राणी आणले जातील. त्यामुळे या ठिकाणी प्राणीशास्त्राचा अभ्यास करता येणार असल्यामुळे ते प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यापीठ ठरेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या प्राणी संग्रहालयातून मिळणाऱ्यामहसुलातून 80 टक्के महसूल पालिकेला तर 20 टक्के महसूल राज्य सरकारला मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी असणाऱ्यारहिवाशांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका राज्य सरकारच्या सहकार्याने गोरेगावच्या आरे कॉलनीत 120 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय उभारत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पालिका आणि वन विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, उपायुक्त सुनील धामणे, वन विभाग प्रधान सचिव विकास खारगे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अन्वर अहमद आदी उपस्थित होते.





















































