पालिकेच्या अर्थसंकल्पात शिवसेनेची वचनपूर्ती! आरोग्य, शिक्षण, विकासकामांना गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेत 97 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. 45 हजार 949.21 कोटींच्या बजेटमध्ये तब्बल 15 खर्च एकटय़ा आरोग्य विभागावर करण्यात येणार आहे. शिवाय पालिकेच्या विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रीज अशा बोर्डांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात येत आहे. मुंबईत पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन दृष्टीने विकास करण्यात येणार असून ‘सर्वांना पाणी’, उत्पन्नवाढीसाठी नवे उपाय करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांपासून जास्त काळ शिवसेना सत्तेत आहे. विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्यामुळेच मतदार शिवसेनेला निवडून देत पाठिंबा देत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. शिवसेनेने 2017च्या निवडणुकीत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची मोठी घोषणा केली होती. याची पूर्तता केल्यामुळे 16 लाख सर्वसामान्य मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, ई-वाचनालय असे अत्याधुनिक उपक्रम राबवले जात आहेत. खड्डेमुक्त प्रवासासाठी जास्तीत जास्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत आहेत. मुंबईकरांना घराजवळच उपचार मिळावेत यासाठी 200 ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ आरोग्य केंद्रे, 100 ‘शिवयोग केंद्रे’ सुरू करण्यात येणार आहेत.

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी हवामान कृती कक्ष

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहन पॉलिसी राबवण्यात येत आहे. या शिवाय स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी ‘हवामान कृती’ कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईन ‘वूमन फॉर क्लायमेट’, ‘सीटीज फॉर फॉरेस्ट’ आणि ‘रेस टू झीरो’ (कार्बन झीरो) उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. ‘हवामान कृती आराखडय़ा’च्या माध्यमातून मुंबईतील प्रदूषण कमी करून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येत आहे. मियावकी वने उपक्रमात 4 लाख झाडे लावण्यात येणार असून 3 लाख झाडे आतापर्यंत लावण्यातही आली आहेत.

कचरा झाला कमी

कचरा व्यवस्थापन उपक्रमात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांपूर्वी साडेतास हजार मेट्रिक टन असणारे दिवसातील कचऱयाचे प्रमाण आता सुमारे 6 हजार मेट्रिक टनांवर आले आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये 600 मेट्रिक टन कचऱयापासून वीज तयार करण्याचा उपक्रमही राबवण्यात येत आहे.

शब्द पाळला

  • मुंबईत अतिवृष्टीत पाणी साचण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पोर्टेबल पंपिंग स्टेशन, माहुल, मोगरा पंपिंग
    स्टेशन्स सुरू करण्यात येत आहेत.
  • आर्थिक संकटात असलेल्या ‘बेस्ट’ला आतापर्यंत साडेतीन हजार देण्यात आले असून यावर्षी 800 कोटींचे
    सहाय्य.
  • मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडसह रस्ते वाहतुकीसाठी 8973.87 कोटींची तरतूद. 21 पूल नव्याने बांधणार.
  • उड्डाणपुलांखालील जागा, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, दर्जेदार फुटपाथ, 25 लाख पार्किंग, नद्यांच्या गतवैभवासाठी काम सुरू. मलनिस्सारण वाहिन्यांसाठी 195.42 कोटी.
  • आश्रय योजनेत सफाई कामगारांसाठी 13 हजार घरे, कर्मचाऱयांसाठी विमा संरक्षण, सर्वसामान्यांसाठी 8999228999 हा ‘व्हॉट्स ऍप चॅट बॉट’ उपक्रम. मैदाने-उद्यानांचे अद्ययावतीकरण, क्रीडा संकुलाची उभारणी.