
मुंबईत जागोजागी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूककोंडी आणि प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे पालिकेने ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुढील 75 दिवसांचा ‘मायक्रो प्लॅन’ करून आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना आज दिले. मुंबईत सुरू असलेल्या कामांमध्ये पहिल्या टप्प्यातील 77 टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील 53 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेत सुमारे 2500 किमीचे रस्ते येतात. या रस्त्यांवर पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डय़ांमुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होते. शिवाय नागरिकांना नाहक मनस्तापही सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वाधिक रस्ते सिमेंट काँक्रिटने बनवण्यात येत आहेत. या कामांचा आढावा आज आयुक्तांनी घेतला. यावेळी ते म्हणाले की, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पांमुळे रस्ते प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि जलद होणार आहेत. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित आणि सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टीने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे गगराणी यावेळी म्हणाले.
असे होतेय काम
रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा-1 आणि टप्पा-2 अंतर्गत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 अखेर एकूण 1594 रस्त्यांचे मिळून 430.69 किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
– टप्पा 1 अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी 77 टक्के, तर टप्पा 2 अंतर्गत 52 टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा 1 आणि टप्पा 2 असे एकत्रित मिळून पूर्ण कामांचे प्रमाण 63 टक्के आहे.
– 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली कामे प्राधान्याने पूर्ण करा. ही कामे होत असताना अभियंत्यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाच्या दर्जावर नजर ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.





























































