
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेच्या कर्मचाऱयांना दिवाळीपूर्वीच खूशखबर मिळाली आहे. कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले असून पालिका कर्मचाऱयांना ही वाढ जुलै 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार हा वाढीव भत्त्यासह व तीन महिन्यांच्या थकबाकीसह मिळणार असून 1 लाख 10 हजार कर्मचाऱयांना त्याचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने महागाई भत्त्याचा दर 142 टक्क्यांवरून 148 टक्क्यांवर केला आहे. त्यानुसार पालिका कर्मचाऱयांना सध्या आकारण्यात येणाऱया महागाई भत्त्याच्या दरातही 142 टक्क्यांवरून 148 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पगारात ही वाढ समाविष्ट करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने मानव संसाधन विभागाला (एच आर) दिल्या आहेत. तसेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही या पगारात देण्याबाबत कळवण्यात आले आहे. पगारवाढीमुळे होणारा अतिरिक्त खर्च हा संबंधित आस्थापनांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून भागविण्यात येणार आहे.
यांना लाभ मिळणार
पालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे.
यांना लाभ मिळणार नाही
माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन घेणाऱया माध्यमिक शाळांतील शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱयांना हा लाभ मिळणार नाही.
पालिका कर्मचाऱयांचा पगार पुन्हा बायोमेट्रिकला जोडणार
पालिका कर्मचाऱयांचा पगार पुन्हा एकदा बायोमेट्रिक हजेरीला जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून महापालिकेच्या सर्व कर्मचाऱयांचे वेतन हे त्यांच्या ‘बायोमेट्रिक’ हजेरीला जोडण्यात येणार असून कर्मचाऱयांच्या उपस्थितीनुसारच त्यांचे वेतन दिले जाणार आहे. लेटलतिफांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये गेल्या वर्षीपासून बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू करण्यात आली. मस्टरवरील लावण्यात येणाऱया हजेरीमुळे काही कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचा तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीची पद्धत आणली, मात्र अनेक ठिकाणी मशीन्स कमी पडल्यामुळे कर्मचाऱयांना थंब इप्रेशनसाठी थांबावे लागत असल्यामुळे त्यांचा लेट मार्क लागू लागला. पालिकेच्या अनेक विभागांतील कर्मचारी हे फिल्डवर काम करत असल्यामुळे त्यांच्या हजेरीच्या नोंदणीबाबत त्रुटी राहत होत्या. अखेर या बायोमेट्रिक हजेरीबाबत कर्मचाऱयांमध्ये नाराजी पसरली होती.
20 कर्मचाऱयांमागे एक यंत्र
प्रत्येक 20 कर्मचाऱयांच्या मागे एक ‘बायेमेट्रिक’ यंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास कर्मचाऱयांना त्यांची हजेरी नोंदविण्यासाठी पर्याय उपलब्ध व्हावा या हेतूने सर्व खात्यांमध्ये व सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अतिरिक्त ‘बायोमेट्रिक’ यंत्र पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
























































