
अनेक नोटिसा दिल्यानंतरही मालमत्ता कर थकवणाऱयांविरोधात मुंबई महापालिकेची धडक कारवाई सुरू असून आलिशान वाहनांची जप्ती तसेच इमारतींचा पाणीपुरवठा तोडून कर थकबाकीदारांना वठणीवर आणण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेची धडक कारवाई सुरू असून आतापर्यंत 3 हजार 650 कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे.
मुंबईकरांना मुंबई महापालिका अत्यंत माफक दरात शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा देते. त्याचबरोबर विविध करांतून महसूल गोळा करून त्याचा वापर मुंबईसाठी विकासकामे आणि विविध कल्याणकारी योजनांवर खर्च करते. केंद्राने जीएसटी कर लागू केल्यामुळे मुंबईसह काही महत्त्वाच्या महापालिकांचा जकात कर रद्द करण्यात आला. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी मालमत्ता कर हाच महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र ‘’मालमत्ता कर’ काही मुंबईकर नोटीस पाठवूनही वेळेवर भरत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात धडक कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मालमत्ता कर थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी आलिशान वाहनांची जप्ती करण्यात आली असून काही ठिकाणी जल-जोडणी तोडण्यात आली आहे. पालिकेची ही धडक कारवाई पाहून कर चुकवणाऱयांनी थकीत रकमेचा भरणा महापालिकेकडे केला आहे. त्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात 5 हजार 200 कोटींचा थकीत मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 3 हजार 650 कोटी एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
जनजागृतीवर भर
मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरावा आणि थकवू नये तसेच थकवलेला कर तत्काळ भरावा यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी विभागा-विभागांत जाऊन जनजागृती करत आहेत. वाहनांतून फिरत स्पीकरवरून पालिकेचे कर्मचारी मुंबईकरांना कर भरण्यासाठी आवाहन करत आहेत.
महापालिकेने केलेल्या 5 महत्त्वाच्या कारवाया
‘एम-पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी. लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांनी मालमत्ता कराचे 38 लाख 80 हजार 705 रुपये थकवल्यामुळे त्यांच्या मालकीची ‘बीएमडब्ल्यू कार’ जप्त करण्यात आली. त्यांनी 19 लाख इतकी रक्कम जमा करून गाडी सोडवून नेली.
एम-पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनिटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांनी 1 कोटी 10 लाख 22 हजार 240 कर थकवल्याप्रकरणी त्यांच्या मालकीची ‘ब्रिझा कार’ जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस ‘सील’ करून बांधकाम बंद करण्यात आले.
‘एच-पूर्व’ विभागाच्या हद्दीतील मे. भारत डायमंड बोर्स यांच्याकडून 25.86 कोटी इतकी मालमता कर वसुली करण्यात आली. तसेच ‘मे. रिलायन्स इंडस्ट्रीज लि.’ यांच्या विविध मालमत्तांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तक्रारी प्रकरणातून 39 कोटींच्या रकमेची वसुली करण्यात आली.
‘के-पूर्व’ मधील ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’ यांच्या जलजोडण्या तसेच मलवाहिनीही तोडली. या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या 50 टक्के रक्कम अनुक्रमे 9.60 कोटी व 31 लाख रुपये भरण्यात आली. पालिकेच्या ‘एम-पश्चिम’ विभागातील ‘आयमॅक्स थिएटर’ची मालमत्ता कराची थकबाकी 75 लाखांपर्यंत पोहोचल्यामुळे जलजोडणी खंडित करण्यात आली.
































































