‘मास्क’ न वापरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई, 5 महिन्यांत 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱयांविरोधात गेल्या पाच महिन्यांत मुंबई महानगरपालिकेने 2 हजार 798 जणांकडून 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल केला आहे तर योग्यरीत्या मास्क न लावणाऱया 9 हजार 954 जणांना पालिकेने समज देऊन सोडले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने ‘मास्क’ लावणे बंधनकारक केले आहे. ‘मास्क’चा वापर न करणाऱयांना एक हजाराचा दंड केला जातो. महापालिका ‘मास्क’ वापरण्याविषयक जनजागृती करण्याबरोबरच नियम न पाळणाऱया आणि चेहऱयावर मास्क न लावणाऱयांवर दंडात्मक कारवाई करत आहे. सार्वजनिक ठिकाणी 9 एप्रिल 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान ‘मास्क’ न लावलेल्या 2 हजार 798 जणांकडून 27 लाख 48 हजार 700 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘मास्क’ योग्यरीत्या न लावणाऱया 9 हजार 954 व्यक्तींना समज देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडताना ‘मास्क’ घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अंधेरी, वर्सोवातून सर्वाधिक दंड
मुंबईत पाच महिन्यांत सर्वाधिक 5 लाख 4 हजार इतकी दंडवसुली ही पालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागामध्ये येणाऱया अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम इथून करण्यात आली आहे. त्याखालोखाल रुपये 4 लाख 21 हजार इतका दंड ‘आर/दक्षिण’ विभागात तर रुपये 4 लाख 8 हजार 500 इतका दंड ‘सी’ विभागाद्वारे वसूल करण्यात आला. मे महिन्यात ‘मास्क’चा नियम सर्वात जास्त वेळा मोडण्यात आला. त्यामुळे या एका महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त दंडवसुली झाली.