
मुंबई महापालिका आता आपल्याच भूखंडांवर राहत असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास करणार आहे. पालिकेच्या 64 भूखंडांवर 51 हजार 582 झोपडीधारक असून त्यांना या पुनर्विकासातून हक्काचे घर मिळणार आहे. दरम्यान, या झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी पात्र आणि अनुभवी विकासकांकडून नियुक्तीसाठी (ईओआय) अर्ज मागवण्यात आले आहेत. डीसीपीआर 2034 अंतर्गत नियमन 33(10) नुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मुंबई शहरांसह पश्चिम व पूर्व उपनगरांतील मुंबई महापालिकेच्या विविध आरक्षित असलेल्या 64 भूखंडांवर सुमारे 51 हजार 582 झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. आता या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. यानुसार पालिकेकडून या भूखंडांवरील झोपडीधारकांच्या योजनाची माहिती, विकासक नेमण्याची चाचपाणी सुरू झाली आहे. भूखंडावरील झोपडीधारकांच्या योजनेतील विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्याकडून 13/2 ची नोटीस देऊन टर्मिनेट (रद्द) करण्यात आले आहे. यामुळे आता या झोपडीधारकांचा पुनर्विकास मुंबई महापालिका संयुक्त भागीदारी तत्त्वावर करणार आहे.
कोणत्या विभागात किती योजना
वॉर्ड – योजना
के – पूर्व – 05
आर – मध्य – 05
पी – नॉर्थ – 12
जी – साऊथ – 02
एम – पश्चिम – 03
एच – पश्चिम – 01
एफ – नॉर्थ – 03
एम – पूर्व – 18
टी – विभाग – 01
एन – विभाग – 08
पी – साऊथ – 08
पुनर्विकासाबाबत एसआरए उदासीन
भूखंडांवरील झोपड्यांचे पुनर्विकास करण्याचा अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) आहे. परंतु त्यांनी अद्यापही या योजनेत कुठलीही प्रगती न केल्याने त्यांच्या अधिकार क्षेत्रातून या पुनर्विकास योजना काढून त्या मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. यासाठी अनुभवी विकासक व संस्थांकडून ईओआय मागितला आहे.