पालिकेच्या दोघा अभियंत्यांविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नळजोडणीच्या कामासाठी पी फॉर्म मिळावा यासाठी अर्ज केला असता अडीच लाखांची मागणी करून त्यापैकी एक लाखाचा पहिला हप्ता घेणाऱया पालिकेच्या ई वॉर्डमधील दोघा अभियंत्यांविरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे.

कुमार (नाव बदललेले) हे या प्रकरणातील तक्रारदार असून ते एका प्लंबरकडे काम करतात. कुमार काम करत असलेल्या विकासकाला एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. सदर इमारतीला ओ.सी. नाही. मात्र मानवतेच्या दृष्टीने नळजोडणीच्या कामासाठी इमारतीतील रहिवाशांनी ई वॉर्ड येथे अर्ज केला होता. या अर्जाचा कुमार हे पाठपुरावा करत होते. या नळजोडणीच्या संदर्भातील पी फॉर्म मिळविण्यासाठी कुमार हे कनिष्ठ अभियंता विश्वंभर शिंदे (28) यांना भेटले. तेव्हा विश्वंभर यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली.

पण लाच द्यायची नसल्याने कुमार यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये देण्यासाठी आज अभियंत्यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा दोघांनी मिळून अडीच लाख द्यावे लागतील असे सांगत विश्वंभर यांनी एक लाख रुपये घेतले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर हा गुन्हा करण्यास प्रेरणा दिल्याप्रकरणी दुय्यम अभियंता सचिन खोदडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अॅण्टी करप्शन ब्युरोचे पथक अधिक तपास करीत आहेत.