दवाखाने, प्रयोगशाळा, सिटी स्कॅन, विद्युतदाहिनी; पालिकेचे आता स्वतंत्र पशुवैद्यकीय आरोग्य खाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील पाळीव प्राणी आणि भटक्या जनावरांसाठी पालिका लवकरच स्वतंत्र पशुवैद्यकीय आरोग्य खाते सुरू करणार आहे. या निर्णयाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली असून यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने, प्रयोगशाळा, विद्युत दाहिनी, प्राणी गणना, कोंडवाडा अशा अनेक अद्ययावत सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या मार्गदर्शनाखाली या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाची रचना करण्यात येत आहे. या विभागाबाबत माहिती देताना देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये म्हणाले की, पशुंपासून माणसांना अनेक आजार होण्याचा धोका असतो. माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशुंचे निकृष्ट मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून होतात. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रॅबिज, ऍन्थ्रॅक्स, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू अशा आजारांचा समावेश होतो. त्यामुळे पशु वैद्यकीय आणि पशुआरोग्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.’ दरम्यान, खार पश्चिम येथे बांधण्यात येणाऱया नव्या इमारतीमध्ये या पशुवैद्यकीय खात्याचे मुख्यालय होणार आहे. २०१८-१९ च्या बजेटमध्ये पशुवैद्यकीय सेवांसाठी १४.५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अशा सुरू होणार सेवा-सुविधा
या खात्यांतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालय, दवाखाने, पशुवधगृह, श्वान निर्बिजीकरण, गुरे कोंडवाडा अशा सुविधा पुरवणार
महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारे अत्याधुनिक पशु वैद्यकीय रुग्णालय या खात्याशी जोडले जाणार.
‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयात सीटी स्कॅन, एमआयआर, सोनोग्राफी, क्ष-किरण, ऑपरेशन थिएटर अशा सुविधा पुरवणार.
या रुग्णालयात एका वेळी ३०० छोटय़ा प्राण्यांना (कुत्रे-मांजरी) सामावून घेण्याची सुविधा
पालिकेची चार श्वान नियंत्रण कार्यालये, गुरांचा कोंडवाडा या खात्याला जोडणार
महालक्ष्मी, देवनार आणि मालाड येथे सीएनजीवर स्मशानभूमी

आवश्यकतेनुसार पदे भरणार
देवनार पशुवधगृहात सध्या कार्यरत असणाऱया २८ पशुवैद्यक व परिमंडळ स्तरावर कार्यरत असणारे ७ पशुवैद्यक यांना या खात्यात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तर ११ पशुवैद्यकांची पदे नव्याने भरण्यात येणार आहे. तर इतर कर्मचाऱ्यांच्या सेवाही या नवीन खात्याकडे वर्ग केल्या जातील. शिवाय भविष्यात आवश्यकतेनुसार नवीन पदे भरण्यात येणार आहेत.