
कोरोनाची दुसरी लाट असताना हरिद्वार येथे पार पडलेल्या कुंभमेळय़ात कोरोना चाचण्यांच्या नावाखाली मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कुंभमेळय़ात खासगी एजन्सींनी केलेल्या एक लाख चाचण्या बनावट असल्याचे उघड झाले आहे. एकाच घरात 530 चाचण्या, एकाच मोबाईल क्रमांकावर 50 जणांचे रजिस्ट्रेशन अशी खळबळजनक माहिती समोर आली असून उत्तराखंड सरकारचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या आरोग्य विभागानेच कुंभमेळय़ात झालेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचण्या बनावट असल्याचे म्हटले होते. आता खासगी एजन्सींचा घोटाळा उघड झाला आहे.
1 ते 30 एप्रिलदरम्यान हरिद्वार येथे कुंभमेळा पार पडला. कोरोनाच्या दुसऱया लाटेत लाखो नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी दिल्यामुळे उत्तराखंडच्या भाजप सरकारवर टीका झाली होती. हरिद्वार आणि परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांवर गेले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुंभमेळय़ासाठी येणाऱयांची चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
असा झाला घोटाळा
- दररोज 50 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याच आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर उत्तराखंड सरकारने नऊ एजन्सी आणि 22 खसगी प्रयोग शाळांना चाचण्यांचे काम दिले. या सर्वांनी कुंभमेळा काळात चार लाख चाचण्या केल्या. तसेच सरकारी प्रयोग शाळेतही चाचण्या केल्या. यात अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या.
- एजन्सीने नमुने गोळा करण्याची जबाबदारी ज्यांना दिली ते 200 जण राजस्थनमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर होते. जे कधीही हरिद्वारला आले नव्हते. त्यांनी बोगस नोंदी केल्या.
- खोटे मोबाईल क्रमांक देण्यात आले. मुंबई, कानपूर, अहमदाबाद आणि इतर 18 ठिकाणच्या लोकांचा एकच मोबाईल क्रमांक दिला.
- एकाच मोबाईल क्रमांकावर 50 जणांचे रजिस्ट्रेशन केले. एकच अँटिजन टेस्ट किट 700 चाचण्यांसाठी वापरले.
- घरांचा पत्ता आणि नावे काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील घर क्रमांक 5 मधील 530 जणांचे नमुने तपासल्याची धक्कादायक नोंद केली. घरक्रमांक 56, अलिगड, घर क्रमांक 76, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत.





























































