
हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्यासाठी बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहित शहा याला मानखुर्द पोलिसांनी दणका दिला. घरातच छापखाना थाटून तो 200, 100 व 50 रुपये दराच्या बनावट नोटा छापताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याच्या घरातून सात लाख 16 हजारांच्या बनावट नेटा आणि त्या छापण्यासाठी लागणारे साहित्य असा नऊ लाख 16 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मानखुर्द येथील सोनापूर परिसरात असलेल्या डुक्कर चाळीतील एका दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली. रोहित शहा नावाचा इसम हे गैरकृत्य करीत असल्याचे कळताच वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी, निरीक्षक राजू सुर्वे तसेच एपीआय दीपक साळवी, उपनिरीक्षक साळवी तसेच सोनावणे, दरेकर, केदार, शिंदे, शेंडे आदींच्या पथकाने डुक्कर चाळीतील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी रोहित शहा हा प्रिंटरवर बनावट नोटा छापत असताना रंगेहाथ सापडला. त्या ठिकाणी 200, 100, 50 रुपये दराच्या बनावट नोटा छापल्याच्या मिळून आल्या.
पोलिसांनी रोहित शहा याला अटक करून बनावट नोटा व त्या छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. बनावट नोटा छापल्यानंतर त्या चलनात आणण्यासाठी तो कोणाला देत होता? बनावट नोटा छापतोय याची कुणकुण कोणाला लागू नये यासाठी दहिसर येथे राहणाऱया रोहितने मानखुर्द येथील एका दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावरील घरात छापखाना थाटला होता. पण मानखुर्द पोलिसांनी त्याचा छापखाना उद्ध्वस्त केला. त्याने याआधी किती बनावट नोटा चलनात आणल्या, त्याचे अन्य साथीदार कोण आहेत याचा मानखुर्द पोलीस कसून तपास करीत आहेत. पूर्व उपनगरातील झोपडपट्टी परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा रोहितचा मनसुबा असल्याचे समजते.


























































