‘बेस्ट’ कर्मचाऱयांना दिवाळीसाठी 10 हजार 100 रुपये! मुख्यमंत्र्यांसोबतच्या यशस्वी चर्चेनंतर महापौरांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीसाठी 10 हजार 100 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी महापौरांसह पालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटनांच्या बैठकीत ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घोषणा केली. पालिकेच्या या निर्णयामुळे ‘बेस्ट’च्या 34 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर यावर्षी पालिकेच्या 1 लाख 11 हजार कर्मचाऱ्यांना नुकताच 15500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ कर्मचाऱयांचे काय होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱया सानुग्रह अनुदानाची रक्कम पालिका ‘बेस्ट’ प्रशासनाला देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम 10 नोव्हेंबरपूर्वी जमा होईल अशी माहिती ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या जोशी, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पी. वेलरासू, ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, कार्याध्यक्ष उदय आमोणकर, सरचिटणीस, रंजना चौधरी, उपाध्यक्ष भूपेंद्र नांदोसकर, भास्कर तोरसकर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

यावर्षी एक हजारांची वाढ
2017 मध्ये ‘बेस्ट’ कर्मचाऱयांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. तर 2019 मध्ये 9100 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यामध्ये यावर्षी यामध्ये एक हजारांची वाढ करून 10 हजार 100 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, ‘बेस्ट’ कर्मचाऱयांना बोनस देण्यासाठी पालिकेवर 36 कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

300 रुपये कोविड भत्ताही देणार
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी ‘बेस्ट’चे कर्मचारी कोविड योद्धा बनून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे या काळात काम केलेल्या कर्मचाऱयांना 300 रुपये कोविड भत्ता देण्यात येणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 300 रुपयांचा कोविड भत्ता काम केलेल्या दिवसांनुसार देण्यात येणार आहे.