
>> पी. व्ही. सावंत
भ्रष्टाचार हा अनादी काळापासून आहे. त्यामुळेच आपल्या सुवर्णभूमीत मोगलांनी 700 वर्षे तर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले. याचे मूळ भ्रष्टाचारात आहे. फुटिरांनी, गद्दारांनी काही तरी मिळविण्यासाठी मोगलांना व इंग्रजांना मदत केली. हाच मोह भल्याभल्यांना होतो. मग त्याची फळं ही आज ना उद्या (Temptation वाढल्यामुळे) भोगावीच लागतात.
आजच्या युगात भ्रष्ट सरकारी कर्मचारी, अधिकारी आदी लोकसेवकांची सध्या तीच गत झाली आहे. लाच स्वीकारताना त्यांना कोणतीही लाजलज्जा वाटत नाही. परंतु अॅण्टी करप्शनकडून ‘ट्रॅप’ झाल्यावर अशा भ्रष्ट लोकसेवकांवर जी वेळ येते तशी एखाद्या शत्रूवरही येऊ नये अशी त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची झालेली बिकट अवस्था पाहून सर्वांना वाटते. यावर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे यांनी फार छान पुस्तक लिहिले आहे. लाचखोर लोकसेवकांनी विलास तुपे यांचे 176 पानांचे हे छोटेखानी पुस्तक वाचल्यास त्यांच्या प्रवृत्तीत, विकृतीत नक्कीच बदल होईल असेही वाटते. महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या हस्ते विलास तुपे लिखित ‘ट्रॅप्स अॅण्टीकरप्शन’ या पुस्तकाचे नुकतेच मुंबई मराठी पत्रकार संघात प्रकाशन झाले.
विलास रंगनाथ तुपे यांची 1973 साली महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली, परंतु त्यांची अर्धीअधिक सेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातच झाली. अगदी साध्या शिपायापासून ते आयपीएस अधिकाऱयांविरुद्ध तुपे यांनी कठोर कारवाई करून आपल्या नावाचा अॅण्टी करप्शन विभागात दबदबा निर्माण केला होता. अगदी खोटी तक्रार करणाऱया फिर्यादींनाही धडा शिकविला होता. अॅण्टी करप्शनकडे करण्यात येत असलेल्या सर्वच तक्रारी खऱया नसतात. काही तक्रारी सूडबुद्धीने धडा शिकविण्यासाठीही केलेल्या असतात. त्याचा एक किस्सा विलास तुपे यांनी आपल्या पुस्तकात नमूद केला आहे तो खालीलप्रमाणे.
पुस्तकातील ‘खोटी तक्रार’ या एका प्रकरणात तुपे म्हणतात, ‘‘22 मार्च 2004 रोजी सकाळी मी वरळी येथील ‘एसीबी’च्या कार्यालयात बसलो असता मला माझ्या वरिष्ठांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले व एका रेशनिंग अधिकाऱयाची ओळख करून दिली. खोटारडे असे त्या तक्रारदार अधिकाऱयाचे आडनाव होते. त्याच्या तक्रारीनुसार त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडे दरमहा तीन हजार रुपये हप्ता मागत होते. परंतु खोटारडे या अधिकाऱयाची प्रामाणिक नावाच्या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱयाला दरमहा लाच देण्याची इच्छा व ऐपतही नव्हती. त्यामुळे त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱयाला रंगेहाथ पकडून अॅण्टी करप्शनच्या ताब्यात द्यायचे होते. तुपे यांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली, परंतु त्या प्रामाणिक नावाच्या अधिकाऱयाची माहिती काढली असता तो नावाप्रमाणेच प्रामाणिक असल्याचे सूत्रांकडून कळले; तरीही नावाप्रमाणे खोटारडे असलेल्या या कनिष्ठ अधिकाऱयाने आपल्याकडे प्रामाणिक लाच मागत असल्याचा आग्रह धरला व तुपे यांना प्रामाणिक या अधिकाऱयाच्या भोवती ‘ट्रॅप’ लावण्यास भाग पाडले.
सापळा रचल्यावर खोटारडे याने त्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडे जाऊन त्याच्या टेबलाच्या ‘ड्रॉव्हर’मध्ये पावडर लावलेल्या तीन हजारांच्या गांधी नोटा जबरदस्ती ठेवल्या व प्रामाणिक याने तीन हजारांच्या नोटा स्वीकारल्या असल्याचे बाहेर उभ्या असलेल्या अॅण्टी करप्शनच्या अधिकाऱयांना सांगितले. परंतु खोटारडे याचा हा बनाव होता हे नंतर उघड झाले. प्रामाणिक यांनी ना लाच मागितली होती ना त्यांनी ती स्वीकारली होती. फिर्यादीने जबरदस्तीने सूडबुद्धीने प्रामाणिक यांना धडा शिकविण्यासाठी अॅण्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. रेशनिंग कार्यालयात खोटारडे व प्रामाणिक यांच्यामध्ये कामावरून रोज खटके उडत होते. त्यामुळे खोटारडे याने अॅण्टी करप्शनकडे प्रामाणिक यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली होती असे तपासात उघड झाले.
अॅण्टी करप्शनकडून ट्रॅप झाल्यावर अॅण्टी करप्शनचे पथक आपल्या बेनामी मालमत्तेचीही चौकशी करते. अगदी कमरेतील करगोट्याचाही हिशेब विचारला जातो. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न निष्पन्न झाल्यास ती प्रॉपर्टी सील केली जाते आणि मग आयुष्यभर कोर्टकचेऱ्या कराव्या लागतात. त्यात लोकसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनाही जेलची सजा होते. आयएएस, आयपीएस अधिकारी, पोलीस प्रॉसिक्युटर, न्यायमूर्तीही यातून सुटलेले नाहीत. विलास तुपे यांचे ‘ट्रॅप्स अॅण्टी करप्शन’ हे पुस्तक वाचल्यास कुणीही शासकीय अधिकारी कुणाकडे उघडपणे लाच मागण्याचे धाडस करणार नाही एवढे नक्की. ‘ट्रॅप’नंतरची लाच घेणाऱया लोकसेवकांची व त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत म्हणजे एक वेळ मरण पत्करले परंतु लाच नको असे ट्रॅप झालेले लोकसेवकच सांगतात.
मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचचा एक अधिकारी आनंद भोईर यास 22 लाखांची लाच घेताना अलीकडेच (1 जानेवारी) अॅण्टी करप्शनच्या पथकाने अटक केली असता त्याने करोडोंची ‘माया’ गोळा केल्याचे उघड झाले असून जरी त्याची जामिनावर सुटका झालेली असली तरी त्याने जमविलेल्या करोडोंच्या मालमत्तेचे तो स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. ज्ञात उत्पन्नापेक्षा हजारो पटीने जमविलेली माया आता त्याला वाचवू शकणार नाही. म्हणजे जमविलेले करोडो रुपये त्याच्या कामास येणार नाहीत. त्याला ‘सजा’ ही अटळच आहे असे तपास अधिकारी सांगतात.
‘ट्रॅप्स’ अॅण्टी करप्शन
पृष्ठे- 176, किंमत – 150
लेखक – विलास तुपे





























































