पानशेत प्रलयाचा ललितवेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पानशेत दुर्घटनेचा ललित अंगाने मागोवा घेणारी कादंबरी पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्याची झालेली वाताहत या महत्त्वाच्या व उत्सुकतेच्या विषयाला मध्यवर्ती ठेवून मराठीतील कवयित्री आश्लेषा महाजन यांनी लिहिलेली ‘12 जुलै 1961’ या शीर्षकाची कादंबरी वाचनात आली. वास्तविक पाहता पुणे आणि पानशेत या विषयावर आजपर्यंत विपुल प्रमाणात लिहून आले आहे, पण लेखिकेची ही कादंबरी पानशेत दुर्घटनेचा ललित अंगाने वेध घेते.

विशेष म्हणजे साहित्याच्या विविध प्रांतांत मुशाफिरी करणाऱ्या आश्लेषांची ही पहिलीच कादंबरी आहे. कादंबरी वाङ्मय प्रकाराच्या प्रांतात त्यांनी केलेले पदार्पण हेच दमदार, जोरदार केलेले आहे. कादंबरीच्या शीषर्कापासूनच वेगळेपणा आपल्यात शोधता येईल. 12 जुलै 1961 रोजी पुण्यात पानशेत धरण फुटून हाहाकार माजला. या घटनेस मागच्या महिन्यात 60 वर्षे पूर्ण झाली, या कादंबरीचे प्रकाशनही 12 जुलै 2021 रोजी झाले. महत्त्वाचे म्हणजे लेखिकेचे सासर आणि माहेर पानशेत धरण फुटल्याने बाधित झाले होते. तेव्हापासून लेखिकेच्या मनात कादंबरीचे बीज बहुदा रुजले असावे. एखादी कादंबरी लिहायची म्हणजे काय करायचे याचा आराखडा लेखिकेने समोर ठेवला. एकूणच विषयाच्या अनुषंगाने नव्या माहिती संकलनातून संदर्भ ग्रंथातून तत्कालीन लोकांच्या भेटीगाठी, चर्चा, मुलाखती यातून ही कादंबरी बहुआयामी होत गेली. साठ वर्षांपूर्वीच्या या घटनेचे विविध पैलू होते. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ब्लर्व या पुस्तकास लाभले आहे. त्यात ते म्हणतात, मुळात पानशेतचा प्रलय ही एक व्यामिश्र स्वरूपाची घटना होती. तिला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असे विविध पैलू होते. तिच्यामुळे पुणे शहराचा चेहरामोहराच बदलून गेला. त्यामुळे तिला इष्टापती म्हणण्याचा मोह होतो. हा विषय पेलने हे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी लेखिकेने हे सर्व विविध पैलू त्यांच्यातील ताण्याबाण्यासह एकाच कथासूत्रात कलात्मक अंगाने स्वीकारले व यशस्वीपणे पेलले आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या ब्लर्वमधून एकूणच कादंबरी लेखनाची दिशाच स्पष्ट केली आहे.

साठ वर्षांपूर्वीचे पुणे मुठा नदीच्या काठी होते. ते जुन्या वाडय़ात, पेठात, चाळीत विस्तारले होते, पण दि. 12 जुलै 1961 रोजी आलेल्या प्रलंयकारी महापुराने होत्याचे नव्हते झाले. या दिवशी पानशेत धरण फुटल्याने पुराचे पाणी गावात, घराघरांत घुसले. वाडे, चाळी, पेठा बघता बघता जलमय झाल्या. माणसे, गुरे वाहून गेली. सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. त्यांच्या चौदा महिन्यांत ही पानशेत धरण फुटीची घटना घडली. पूरग्रस्त परिस्थिती हाताळण्यात आल्याचा ठपका विरोधकांनी चव्हाण सरकारवर ठेवून अविश्वास प्रस्ताव आणला. आचार्य अत्रे यांनी मराठामधून जोरदार टीका केली. तत्कालीन पूरपरिस्थिती चव्हाण यांनी कशी हाताळली, पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले का, हे मातीचे धरण कसे काय फुटले, या भीषण दुर्घटनेस जबाबदार कोण, या सर्व तत्कालीन प्रश्नांचा वेध तर लेखिकेने घेतलाच आहे, पण त्याचसोबत पानशेत धरण प्रलय, समस्या व पुनर्वसनाचे प्रयत्न या 149 पानी रिपोर्टचाही अभ्यास केला आहे.

एवढेच नाहीतर ही कादंबरी जास्तीत जास्त अचूक व्हावी, यासाठी विविध संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबरी लेखनात आलेले उल्लेख यानिमित्ताने झालेले ग्रंथलेखन, विविध वृत्तपत्रांत तेव्हा आलेले लेख अशी भक्कम सामग्री संकलित केली. शिवाय स्वतःही मुलाखती घेतल्या. तत्कालीन पूरग्रस्तांशी चर्चा केली. या पानशेत धरण फुटीमुळे साहित्य विश्वाचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांची पुस्तकांची दुकाने, लेखकांचे संदर्भ ग्रंथ असे किती तरी मौलिक साहित्य वाहून गेले होते. केसरीचे जुने अंक त्यात वाहून गेले, पण ज्यांनी जतन करून ठेवले होते. त्याचीही लेखिकेने भेट घेऊन कादंबरी लेखन वस्तुनिष्ठ केले, मात्र प्रस्तुत कादंबरी लेखनात हे सर्व शोध निबंधाच्या मांडणीप्रमाणे महाजन यांनी मांडले नाही तर ते वाचकांना रुचेल, आवडेल असे आहे. या कादंबरीत या घटनांचा शोध आधुनिक युगातील तरुण-तरुणी घेतात. आर्किटेक्ट असलेली शैली, तिचा प्रियकर चित्ततोष पर्यावरण अभ्यासक ऋतुपर्ण या दुर्घटनेचा माग काढतात. या कादंबरीमधील ही  महत्त्वाची पात्रे, इतर कथा, उपकथा यातून अनेक उपकथानक यात दिसतात. त्यातूनच चित्ततोषच्या आजोबांच्या फसलेल्या प्रेम कहानीचा शोध लागतो. यासारखी अनेक गुणवैशिष्टय़े सांगता येतील. कादंबरी लेखन विषय व्याप्तीसाठी ‘पानशेत 1961’ या नावाचे महाजन यांनी फेसबुक पेजही सुरू केले आहे. त्यावर अधिक माहिती व संदर्भ पूरग्रस्तांच्या कथा, शेअर केल्या जातात. मुळात पानशेत धरण फुटीच्या विषयावर एवढे वेगळे कादंबरी लेखनही आजपर्यंत बहुदा झाले नसावे. याविषयी अनेक ग्रंथांतून बरेच येऊन गेले असले तरी या विषयाचा ललित अंगाने आश्लेषा महाजन यांनी पहिल्यांदाच सर्वव्यापी विचार केला आहे. म्हणून त्यांच्या पहिल्या कादंबरीचे कौतुक. याचे लेखनही लॉकडाऊन काळात त्यांनी करून मिळालेला वेळ सत्कारणी लावत अजय प्रभाकर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ व आतील चित्रही उत्तम आहेत.

12 जुलै 1961

  • पानशेत धरण फुटीच्या पार्श्वभूमीवरची काल्पनिक कादंबरी
  • लेखिका – आश्लेषा महाजन
  • प्रकाशक – इंकिंग इनोव्हेशन्स, वडाळा, मुंबई,
  • पृष्ठे – 282, मूल्य, रुपये 450/-