
>> प्रा. डॉ. रेणुकादास भारस्वाडकर
पुस्तकाचे लेखक डॉक्टर आर. व्ही. पाटील यांचे ‘कोरोना जगावरील आपत्तीचा घाला’ या पुस्तकाचे अतिशय उपयुक्त असे माहितीचे ज्ञानाचे आणि विज्ञानाचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक सध्या नुकतेच प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकाचा एकूण 17 प्रकरणामध्ये विस्तार करण्यात आला आहे . यामध्ये हे कोरोनाचे आक्रमण कसे सुरू झाले, स्थलांतरितांची घालमेल, मूड, लक्षणे व प्रतिकारशक्ती यासंबंधी प्राथमिक स्वरूपाची ची माहिती देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे कोरोना इष्टापत्तीबाबत वेगळ्या प्रकारे या महामारीच्या संकटामधून आपण काय काय चांगले शिकलो हे लेखकाने आपल्यासमोर मांडली आहे. यावरून सकारात्मक दृष्टिकोनातून या पुस्तकाचे मूल्य कितीतरी पटीने वाढले असल्याचे निदर्शनास येते. यामध्ये वाईटातून चांगले काय घडले, काय नवीन गोष्टी आपण शिकलो यासंबंधी लेखकाने विश्लेषण केले आहे हे निश्चितपणे वाखाणण्यासारखे आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी बळ उपलब्ध करण्यामध्ये हे पुस्तक म्हणजे जे एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
महाराष्ट्र राज्यासंबंधीची संपूर्ण माहिती कोरोनाच्या संदर्भातील देण्यात आली आहे. तसेच यापुढे शासनाने भविष्यात काय निर्णय घ्यावेत जेणेकरून, सर्वसामान्य माणसाच्या उत्थान प्रक्रियेमध्ये भर घालण्याचे धाडस या या पुस्तकातून डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांनी निश्चितपणे मांडलेले आहे.
22 मार्च 2020 हा दिवस संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यू’ म्हणून देशवासीयांनी कडकडीत पाळला आणि त्याच रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे लॉक डाऊन घोषित केला. आता तर लॉक डाऊन हा शब्द आबालवृद्धांपासून सगळ्यांच्याच अंगवळणी पडला आहे. वर्तमानपत्रात डोकावताना दररोज यामुळे नागरिकांची होणारी कुचंबणा, रुग्णांनी भरलेले दवाखाने, सरकारसमोर अचानक उभा ठाकलेले संकट आणि या सर्वांचा समर्थपणे सामना करण्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र कार्य करणारी सरकारी यंत्रणा, आपल्यापाशी असलेली मर्यादित साधने आणि अमर्याद रुग्णसंख्येचा देश, याबरोबरच लॉक डाऊनमुळे बंद पडलेल्या कारखान्यातील संघटित आणि असंघटित कामगारांना वर आलेली उपासमारीची वेळ आणि मोठय़ा शहरांमधून गावाकडे जाताना शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणारा कामगार वर्ग अशा दररोज घडणाऱया घटनांना बोलके करण्यासाठी या पुस्तकातील धडपड वाखाणण्यासारखी आहे. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगामध्ये काय उलथापालथ चाललेली आहे हे विषद करताना लेखकाने ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणजे संपूर्ण जग हे एक खेडे आहे अशी भावना मनात ठेवून या पुस्तकांमध्ये संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे या पुस्तकातून मांडली आहेत. निश्चितपणे हा संदर्भग्रंथ सर्वसामान्य माणसापासून ते तज्ञ व्यक्तींपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल.





























































