
श्रुतिका प्रदीप कासार
वैचारिक निद्रानाश…
करू कवित्व काय नाही आता लाज।
मज भक्तराज हासतील।।
आता आला एका निवाडय़ाचा दिस।
सत्याविण रस विरसला।।
अनुभवाविण कोण करी पाप ।।
रिते ची संकल्प लाजलावे ।
तुका म्हणे आता न धरवे धीर।।
नव्हे जीव स्थिर माझा मज।
‘निद्रानाश’ या कविता संग्रहाच्या सुरुवातीला असणाऱया या ओळींमधूनच कवी महेश केळुसकर यांच्या संपूर्ण संग्रहाचा सार आपल्या लक्षात येतो . या संग्रहातून आपल्याला एकूण 46 कवितांचा रस घेता येतो.
ज्या कवितेवरून या संग्रहाचे नाव ठरवण्यात आले त्याच निद्रानाश या कवितेपासून ही कवितांची माळ गुंफली जाते. पुढेपुढे या माळेत वेगवेगळ्या प्रकारच्या, निरनिराळ्या आशयाच्या कविता कोणताही खंड न पडू देता सहज गुंफल्या जातात.
मी तारवटल्या डोळ्यांनी फिरत राहतो
दिवसांमगून दिवस,
मी आंघोळ करतो,
देवांना उदबत्त्या फिरवतो,
जेवतो, पुस्तके वाचतो,
कविता करतो, कविता म्हणतो,
साहित्यसंमेलने, वर्तमानपत्रे,
रेल्वे, मुलाची शाळा, सुपरहिट
मुकाबला…
रुटीन चालत राहाते, धावते,
धापा टाकत पळतेसुद्धा…
रात्री आत्महत्येच्या विचारांची
संथ टिकटिक
सरकत राहते अगदी उशाशीच…
निद्रानाश – अखंड निद्रानाश!
या ओळींमधून कवीने आजच्या काळातले नैराश्य अचूक मांडले आहे. दिवसभर घडय़ाळाच्या काटय़ावर चालणाऱया माणसाच्या मनाला रात्रीसुद्धा निवांतपणा मिळू नये यासारखे दुसरे दुर्दैव नाही. या सगळ्या परिस्थितीला कवीने या वरील ओळींमधून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे .
‘आठवते का तुम्हांला…? ’ या कवितेतून कवीने एखाद्या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर माणसं हळूहळू कशी कोडगी होत जातात याचं वास्तवदर्शी चित्रण केलं आहे. उदाहरणार्थ –
…तुम भी कैसी हरामी हो दुनिया !
हररोज चाहती हो लढाइया ,
छिन लेती हो माँ-बाप, भाई-बहन, घर
और बादमे बोलती हो;
‘ चल, अब आओ बिस्तरपर!’
महेश केळुसकर यांच्या निद्रानाश या कविता संग्रहातून नैराश्य, वास्तविकता, वैचारिक, अतिवैचारिक, उपहास, विरोध अशा मानवी मनाच्या अनेक पैलूंचे दर्शन होते. अनेक गोष्टींचे, परिस्थितीचे नव्याने अर्थ उलगडत जातात.
त्याचप्रमाणे आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरीलही कविता या संग्रहातून वाचायला, अनुभवायला मिळतात.
समकाळाची आणि अस्थित्वप्रश्नांची पिंजण चालू ठेवणारी निद्रानाशमधील कविता जागरणासारखी आपल्याला चढत जाते.
सर्व स्तरांवरील शोषणव्यवस्थेला आव्हान देणारी, तीव्र भावनात्मक आणि वैचारिक अस्वस्थता निर्माण करणारी ‘निद्रानाश’ मधील कवितेची जातकुळी ही हिंदुस्थानी कवितेच्या आध्यात्मिक आणि लोकपरंपरा यांच्याशी स्वतःला जोडून ठेवणारी आहे.
या कविता संग्रहाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे, अनवर हुसेन यांनी तयार केलेलं या संग्रहाचं मुखपृष्ठ. कोणतंही नवीन पुस्तक चाळताना किंवा निवडताना त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे फार महत्त्वाचं ठरतं. अनवर हुसेन यांनी संग्रहाला, त्यातल्या कवितेला साजेसं असं मुखपृष्ठ केलं आहे.
सर्वसाधारणपणे कविता म्हटलं की, त्या समजायला, आत्मसात करायला थोडय़ा कठीण जातात किंवा कविता आणि अलंकारिक भाषा असं एक समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात ठरलेलं असत. अशा या समीकरणाला व्यवस्थित फाटा देऊन कवी महेश केळुसकर यांनी या कविता संग्रहातली प्रत्येक कविता ही साध्या आणि सोप्या भाषेत रचली आहे. या कवितांचा जन्मजात साधेपणा हीच तिच्या अस्सलतेची ऊर्जाखूण आहे, असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही.
महेश केळुसकर यांचा ‘निद्रानाश’ हा कवितासंग्रह वाचताना कवी-गीतकार संदीप खरे यांच्या ‘असे काही व्हावे, मन शांत निजावे…’ या ओळींची आठवण होते.
निद्रानाश
कवी – महेश केळुसकर
प्रकाशक…मौज प्रकाशन
पृष्ठ…76
मूल्य…130




























































