बोरघर पूल धोकादायक; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची पूल पार करताना होतेय कसरत

36

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालुक्यातील बोरघर, चिंचवली, आपेडे या गावांसाठी चोरद नदीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक झाला असल्याने पुलावरून मार्गक्रमण करताना पादचारी आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. १९७५ साली बांधण्यात आलेल्या या पुलाची डागडुजी करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

खेड तालुक्यातील बोरघर आपेडे, चिंचवली या गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात चोरद नदी पार करता यावी यासाठी १९७५ साली या पुलाची उभारणी करण्यात आली. पुलाच्या उभारणीनंतर बोरघर, चिंचवली, वावे, आपेडे या गावातील ग्रामस्थांची चांगली सोय झाली. बोरघर येथील माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न सुटला. मात्र सद्य स्थितीत हा पूल जुना झाल्याने पूल पार करताना विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. धोकादायक झालेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष्य केले जात असल्याने पुलावर दुर्घटना घडल्यावर संबधीत खात्याला जग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

महार्गावरून बोरघर, आपेडे, चिंचवली, वावे, या गावांमध्ये जाण्यासाठी हा पूल अतिशय महत्वाचा आहे. रात्रं-दिवस पुलावरून पादचारी, वाहनांचा राबता असतो. त्यामुळे हा पूल सुस्थितीत असणे फार गरजेचे आहे. मात्र सद्य स्थितीत पुलाला मधोमध तडा गेला असल्याने पुलावरून जा-ये करणे धोकादायक झाले आहे. गेले काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्शवभूमीवर पुलाचा धोका आणखी वाढला असल्याने संबंधित खात्याने तातडीने पुलाच्या डागडुजीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी बोरघर सरपंच उदय बोरकर यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या