सख्ख्या भावानेच डोक्यात गोळी घालून केला खून, गावठी पिस्तूलासह वाहन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू पिऊन आई – वडिलांना व अपंग बहिणीला शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळेच सख्ख्या भावाने डोक्यात गोळी घालून भावाची हत्या केली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून गावठी पिस्तूल आणि एक दुजाकी जप्त करण्यात आली आहे.

7 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण हद्दीत मौजे भातखेडा येथील पोलीस पाटील महादेव मारोती भालेराव यांनी कळविले की, भातखेडा येथील सुरज गोविंद मुळे (25) याचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे वडील गोविंद मुळे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर या करीत होत्या. सरकारी दवाखाना लातूर येथे पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. शविवच्छेदना दरम्यान सुरज मुळे यास शस्त्राचा वापर करून त्याच्या डोक्यात गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस ठाणे लातूर ग्रामिण येथे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अन्वेषण अधिकारी दिपककुमार वाघमारे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हे सदर गुन्ह्याचा तपास करीत त्यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील सुरज व त्याचा भाऊ धिरज यांच्यात सतत घरगुती कारणावरून वाद व्हायचे. तसेच सुरज यास धिरज याने जिवे मारण्याची धमकी दिलेली होती. सुरज नेहमी दारू पिऊन आई – वडिलांना व अपंग बहिणीला, धिरजला सतत मारहाण करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून धिरज हा आई, बहिणीला घेऊन पुणे येथे कामासाठी निघून गेला होता.

धिरज गोविंद मुळे याला ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की, तो व त्याच्या कुटुंबियांना सुरज सतत दारू पिऊन त्रास देवून मारहाण करीत होता. त्यामुळे त्याला जिवे मारण्याचे निश्चीत करून 7 फेब्रुवारी रोजी पहाटे 03 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास धिरज हा त्याचा मित्र अमर गायकवाड रा. भातखेडा यास लातूर येथुन घेतले. अमर याची मोटारसायकल घेऊन दोघेही भातखेडा गावी सुरज राहत असलेल्या घरी गेले. अमर गायकवाड यास घराबाहेर रेकी करण्यासाठी सांगुन स्वत: धिरज मुळे हा घरामध्ये गेला. भाऊ सुरज मुळे हा झोपेत असतांना धिरज कडे असलेल्या गावठी पिस्तुलातून सुरजच्या डोक्यात गोळी झाडून खून केला आणि त्याच मोटारसायकलवर लातूर येथे परत आले. धिरज मुळे हा पुणे येथे निघुन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

धिरज मुळे हा पुणे येथे एका खाजगी सुरक्षा एजन्सी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता व स्वतःचे लग्न जमविण्याठी गावी भातखेडा येथे जायचे आहे, असे खोटे सांगुन रजा घेऊन रात्रीतून पुणे येथुन लातूर येथे आला होता. धिरज याने स्वतःचा सख्खा भाऊ सुरज याच्यावर गोळी झाडून त्याचा खून करून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तुल हे पुणे येथे त्याच्या मित्राच्या घरी लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरचे गावठी पिस्तुल पुणे येथून जप्त करण्यात आले व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अमर गायकवाड यांच्याकडून भातखेडा येथुन जप्त करण्यात आले आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी दिपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पोलीस अंमलदार विष्णू चौगुले, सतिष लामतुरे, सचिन चंद्रपाटले, राहुल दरोडे, नितीन पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे रवि गोंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे यांनी परीश्रम घेतले.