
माझ्या एका खिशात ब्राह्मण आहेत, तर दुसऱया खिशात बनिया (व्यापारी) मतदार आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व मध्य प्रदेशातील भाजपचे प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पी. मुरलीधर राव हे वादग्रस्त वक्तव्यासाठी अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना नालायक म्हटले होते. भाजपला कधी भाजप आणि व्यापाऱयांचा पक्ष म्हटले जाते आणि भाजप आता एससी, एसटी वर्गाकडे लक्ष देणार, असे सांगितले जात आहे. भाजपची घोषणा ‘सबका साथ, सबका विकास’ असताना जातीच्या नावावर मते का मागितली जातात, असा प्रश्न पत्रकारांनी मुरलीधर राव यांना विचारला होता. त्यावर बोलताना मुरलीधर राव यांनी आपल्या शर्टाच्या खिशांकडे इशारा केला. ‘माझ्या एका खिशात ब्राह्मण आहेत, तर दुसऱया खिशात बनिया (व्यापारी) मतदार आहेत’, असे खळबळजनक विधान मुरलीधर राव यांनी केले.
यानंतर सारवासारव करताना राव म्हणाले, तुम्ही आम्हाला ब्राह्मण, व्यापाऱयांचा पक्ष म्हटले. कारण आमच्या पक्षाची व्होट बँक, आमचे कार्यकर्ते, नेते या वर्गाचे आहेत; परंतु आम्ही एससी, एसटी वर्गाच्या लोकांना जोडण्याचे काम करीत आहोत. सर्वांचा पक्ष बनविण्याचे काम सुरू आहे.
मुरलीधर राव यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न करताना काँग्रेसकडून आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केले जात असल्याचे म्हटले आहे.
माफी मागा – काँग्रेस
भाजपच्या प्रभारींनी ब्राह्मण आणि व्यापारीवर्गाचा घोर अपमान केला आहे. त्यांनी दोन्ही समाजांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली.

























































