रजनी विल माइंड इट! रजनीकांत यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांवर होणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचे केवळ दक्षिणेत किंवा हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. रजनीकांत यांची तशी ओळख करून देण्याची गरजच भासत नाही. रजनीकांतचे चाहते जगभरातून आहेत. पण दरम्यान, रजनीकांत यांनी आपल्या वैयक्तिक अधिकारांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. रजनीकांत यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक फायद्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देणारी नोटीस जारी करण्यात आली आहे.

कठोर कारवाईचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांचे वकील सुब्बिया इलांभराथी यांनी नोटीस जारी करून त्यात असे म्हटले आहे की, व्यावसायिक हेतूंसाठी त्यांचे नाव, प्रतिमा आणि प्रतिमेचा अनधिकृत वापर होत असल्याने अशा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेकदा असे दिसून येते की, काही लोक प्रसिद्धीसाठी, उत्पादने इत्यादी व्यावसायिकरित्या विकण्यासाठी सेलिब्रिटींची नाव, फोटो, आवाज वापरतात. त्यामुळे रजनीकांत यांच्या कायदेशीर विभागाने एक नोटीस जारी करत कंपन्यांना रजनीकांत यांच्या प्रतिमा, नाव अथवा इतर गोष्टींचा वापर अनधिकृत करु नये असा सल्ला दिला आहे. तसेच, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.