
सामना प्रतिनिधी । मुंबई
मालाडमध्ये 1 जुलै रोजी संरक्षक भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 29 जणांचा बळी गेला असताना आता जलाशयाच्या भिंतीलाच तडे गेल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने जलाशयाला भगदाड पडल्यास या परिसरातील पालिका कर्मचाऱयांची वसाहत आणि परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या जलाशयाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
मालाड येथील पालिकेचा जलाशय असलेल्या टेकडीला बांधलेली संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील संरक्षक भिंतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर महापौर पिं. विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. यामध्ये पालिकेच्या जलाशयालाच तडे गेल्याचे दिसल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले. या ठिकाणी पालिकेच्या पाणी खात्यामधील कर्मचाऱयांच्या वसाहतीच्या पाच इमारती आहेत. शिवाय दुर्घटना घडून पाण्याचा मोठा प्रवाह आल्यास परिसरातील इतर घरांनाही फटका बसू शकतो. त्यामुळे पालिकेने या जलाशयाची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणीही त्यांनी केली.
काँक्रीटची भिंत असूनही फक्त दीड वर्षात कोसळून दुर्घटना घडली. त्यामुळे पालिका नव्याने भिंत नेमक्या कोणत्या प्रकारे बांधणार आहे हे स्पष्ट करावे असे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या, तर आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन, जीवघेणे प्रदूषण असलेल्या माहुलमध्ये न करता सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी केलेल्या सूचनांची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

























































