पांझण नदीवरील पादचारी पूल खचला

573

शहरातील एचएके हायस्कूलच्या पाठीमागे पांझण नदीवरील पादचारी पूल खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची पायपीट वाढली आहे. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख यांच्यासह तेथील नागरिकांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली.
1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री शहरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन रामगुळणा-पांझण नदीला मोठा पूर आला. त्यात एचएके हायस्कूलच्या मागे पांझण नदीवरील पादचारी पूल मोठय़ा प्रमाणावर खचला. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली. मनमाड -नांदगाव रोडवरील सिकंदर नगर, डॉ. आंबेडकर नगर, कीर्ती नगर, माऊली नगर, बुधलवाडी या भागांतील रहिवाशांना शहरात, बाजारपेठेत येण्या आणि जाण्यासाठी हा पूल मध्यवर्ती आणि सोयीचा होता. तो खचल्याने या मोठय़ा भागांतील रहिवाशांचा रहदारीचा संपर्क तुटला आहे. शालेय विद्यार्थीदेखील याच पुलावरून ये-जा करत होते. त्यांचीही गैरसोय झाली. आता वरील भागांतील सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांना लांबच्या रस्त्याने बाजारपेठेत यावे लागते. तसेच सर्व शाळाही आता सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीवरील पूल खचल्याने या रहिवाशांना आता राज्य मार्गावरून मालेगाव नाका येथून यावे लागते. या भागातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते.
एचएके हायस्कूलमागील पूल हा 30 ते 35 वर्षांपूर्वीचा आहे. दिवंगत खासदार हरिभाऊ महाले यांच्या निधीतून या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. त्या परिस्थितीनुसार बांधलेल्या या पुलाची उंचीही गैरसोयीची ठरत असून ती वाढवणेही गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासनाने सदर पुलाची दुरुस्ती करून त्याची उंची वाढवावी तसेच या समस्येबाबत खासदार डॉ. भारती पवार व आमदार सुहास कांदे यांनाही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या