
मध्य प्रदेशमध्ये दोन भाऊ दुचाकीवरून घरी जात होते, तेव्हा एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मागे बसलेल्या एका भावाने बिबट्याच्या तोंडावर हातातला केक फेकून मारला, त्यामुळे दोघे भाऊ थोडक्यात बचावले.
मध्य प्रदेशच्या नेपानगरमध्ये रविवारी फिरोज मन्सूरी आपल्या मुलाच्या वाढदिवासाठी साबिरी मन्सूरीसोबत बाईकवर केक आणायला गेले होते. तेव्हा संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतताना उसाच्या शेतातून एक बिबट्या बाहेर आला आणि दोघांचा पाठलाग करू लागला. फिरोज मन्सूर गाडी चालवत होते तर साबिर मन्सूरी मागे बसले होते. तेव्हा बिबट्याने साबिरच्या हातातील केकच्या डब्याला पंजा मारला. तेवढ्यात साबिरने बिबट्याच्या तोंडावर केक फेकून मारला. तोंडावर केक लागल्याने बिबट्या गोंधळला आणि तेवढ्यात मन्सूर बंधूनी तिथून पळ काढला. नंतर बिबट्याही ऊसाच्या शेतात पळून गेला.
मन्सूर बंधू सुखरुप घरी पोहोचले आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. प्रथम वनविभागाने बिबट्या असल्याचे अमान्य केले नंतर रस्त्यात त्याच्या पावलाचे ठसे आढळल्याने विभागाने ही बाब मान्य केली.




























































