
बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धुडगूस घालण्यात आला. त्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत शिवसैनिकांना धमकावलं आहे.
गायकवाड यांनी शिवसैनिकांना चुन चुन के मारे जाएंगे असं म्हणत धमकावलं आहे. तसंच, ज्यांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांना हीच भाषा वापरली जाईल. शनिवारी पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर हिशोब चुकता केला असता, अशी धमकीही गायकवाड यांनी शिवसैनिकांना दिली आहे.
शनिवारी बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे.
































































