
बुल्लीबाई प्रकरणात सायबर पोलिसांनी दिल्लीहून नीरज बिष्णोई, ओंकारेश्वर ठाकूरला तर ओडिशाहून नीरज सिंगला अटक केली आहे. नीरज सिंगला ट्रान्झिट रिमांडवर शुक्रवारी मुंबईत आणले जाणार आहे. बिष्णोई आणि ठाकूर दोघे मुख्य सूत्रधार असून सुली डील्स आणि बुल्लीबाई अॅप्समध्ये कोडिंगचे काम ठाकूरने तर अॅप्सनिर्मितीचे काम बिष्णोईने केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या तिघांच्या अटकेने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
मुस्लिम समाजातील महिलांची बदनामीप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून बंगळुरू येथून विशाल झा तर उत्तराखंड येथून श्वेता सिंग, मयांक रावतला अटक केली होती. त्या तिघांच्या अटकेदरम्यान दिल्ली पोलिसांनी अॅप्सचा निर्माता नीरज बिष्णोईला अटक केली. नीरजच्या चौकशी ओंकारेश्वरचे नाव समोर आले. त्यालादेखील दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. ते दोघे दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होते. त्या दोघांच्या कोठडीसाठी सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथून पोलिसांनी नीरज आणि ओंकारेश्वरला अटक करून आज मुंबईत आणले. त्या दोघांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिष्णोई हा अॅप्सचा निर्माता असून ओंकारेश्वरने अॅप्ससाठी कोडिंगचे काम केले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तर त्या दोघांनी मुस्लिम महिलांचे काही फोटो आणि वैयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर अपलोड केली होती. नीरज हा जपानी गेमचे नाव वापरून तो स्वतःची ओळख लपवत होता. त्याला ओंकारेश्वरने अॅप्सच्या निर्मितीची आयडिया दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या गुन्हय़ाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी विशालची चौकशी केली. त्याच्या चौकशीत नीरज सिंहचे नाव समोर आले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक ओडिशा येथे गेले. तेथून नीरज सिंहला पोलिसांनी अटक केली. नीरजचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले असून तो बिष्णोईच्या संपर्कात होता. नीरज सिंहदेखील या टोळीतील एक सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिघांचा जमीन अर्ज फेटाळला
बुल्लीबाई प्रकरणात न्यायालयाने विशाल झा, श्वेता सिंह आणि मयांक रावतचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्या तिघांना जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागणार आहे. बुल्लीबाई प्रकरणात अटक केलेले ते तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या तिघांच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर सरकारी वकिलांनी त्या तिघांच्या जामिनाला विरोध केला. ते तिघे उच्च शिक्षित असून जामिनावर सुटका झाल्यावर ते पुरावे नष्ट करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आज न्यायालयाने त्या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

























































