
सामना प्रतिनिधी । ठाणे
न्यायालयीन लढाईत अडकलेली ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील अतिधोकादायक बुमरा निवास अखेर शुक्रवारी मध्यरात्री कोसळली. ठाणे महापालिकेने पाच वर्षांपूर्वीच ही इमारत अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यामुळे रहिवाशांनी ती आधीच रिकामी केली होती. त्यामुळे या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली. दरम्यान न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही इमारत पाडण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते, मात्र हे काम सुरू होण्याआधीच मजले खचले आणि ही घटना घडली.
पालिकेची हेल्पलाइन
ठाणे महापालिका हद्दीतील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र त्याव्यतिरिक्त एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास ठाणेकरांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नौपाडा- २५३८४६३१, वागळे- २५३६३५८०, लोकमान्य- २५८८५०४३, वर्तकनगर- २५८८५८०, माजीवडा- २५४६२०९२, उथळसर- २५४७३५६८, कळवा- २५३७१६३०, मुंब्रा- २५३७१६३०, दिवा- ९८३३३४३५६८.


























































