
बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून इटालीयन बनावटीचे पिस्तूल, आठ राऊंड, चार तोळ्याची सोन्याची साखळी, दोन लाखांची रोकड असा एकूण 6 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना औंध येथील सिंध सोसायटी परिसरात घडली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश लक्ष्मणराव कदम (57, रा. औंध) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी स्वसंरक्षणासाठी ईटालीयन बनावटीचे परवानाधारक पिस्तुल घेतले आहे. गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबीयांसह घरात झोपले होते. दुसर्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता उठले असता त्यांना बेडरूमधील लाकडी ड्रावर उघडे दिसले. तसेच, त्यातील चाव्याही दिसल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी कपाटात पाहिले असता आणखी वस्तू चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वत्र पाहिले असता हॉलची खिडकी उघडी दिसली. यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत आहेत.






























































