
तामिळनाडूतील वलपराईजवळ एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 30 जण जखमी झाले. वलपराई घाट विभागातील वळणदार डोंगराळ रस्त्यांजवळील केव्हर्स इस्टेट क्षेत्राजवळ तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळची ही बस उलटून 20 फूट खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 72 प्रवासी होते आणि बस तिरुप्पूरहून पलापराईला जात होती. डोंगराळ भागात अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असं बोललं जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस रस्त्यापासून घसरली आणि दरीत कोसळली. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वालपराई पोलीस, रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरू केले. आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने डोंगराळ भागात बचाव कार्य केले आणि जखमींना बसमधून बाहेर काढले. नंतर त्यांना वलपराई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत बस चालक गणेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी पोल्लाची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.