वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बस-पिकपची भीषण घडक, दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई

लातूर येथील लग्न आटोपून अंबाजोगाई कडे येणाऱ्या खासगी बस आणि पिकअपचा सेलूआंबा येथे भीषण अपघात होऊन दोघे ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री झाला. गुत्तेदाराने अर्ध्या रस्त्यात टाकून ठेवलेला मातीचा ढिगारा चुकवताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चक्का जाम करत वाहतूक बंद पाडली.

अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाचे रविवारी दुपारी लातूर येथे लग्न पार पडले. या लग्नाचे वऱ्हाड घेऊन खाजगी बस (एमएच 44 यू 8171) अंबाजोगाईकडे येत होती. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही बस सेलूआंबा येथे आली असता अर्ध्या रस्त्यापर्यंत टाकण्यात आलेला मातीच ढिगारा चुकवताना बसने समोरून येणाऱ्या पिकअप गाडीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून जनावरांना पाणी पाजण्यासाठी निघालेले पांडुरंग शेषेराव ढोपरे (वय 45,रा. सेलूआंबा) यांचा आणि पिकअप मधील सतीश शंकर राठोड (वय 35, रा. गरसुळी तांडा) या ग्रील कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील मुक्ता प्रसाद भगत (35), शांताबाई लोमटे (60), कस्तूरबाई लोमटे (60), कौशल्या भगत (65), पद्मिन बाबुराव भगत (60) आणि मीनाबाई सुरज कुंभार (40) सर्व रा. वाघाळा या सहा महिला किरकोळ जखमी झाल्या. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.