बस कंडक्टर बनला हरित योद्धा; तिकिटासोबत रोपटं मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोईम्बतूरमध्ये राहणारे मारीमुत्थू योगनाथन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. बस कंडक्टर असलेल्या मारीमुत्थू योगनाथन खरे पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांनी गेल्या 34 वर्षांमध्ये तीन लाख रोपं लावली आहेत. एवढेच नव्हे तर कित्येक वर्षे ते बसमधील प्रवाशांना तिकिटासोबत रोपटं भेट देतात.

मारीमुत्थू योगनाथन तामीळनाडूच्या राज्य परिवहन सेवेत कंडक्टर  आहेत. आपले आयुष्य त्यांनी पर्यावरणाला वाहिलं आहे. समाज  बदलायचा असेल तर तुम्ही समाजसेवकच असलं पाहिजे असं काही नाही. आपल्या नोकरीशी प्रामाणिक राहूनही स्वच्छ आणि हरित समाज निर्माण करू शकतो हे योगनाथन यांनी दाखवून दिले आहे. ते घराजवळील तीन एकर जमिनीत रोपं लावतात. नोकरी सांभाळून उरलेला वेळ रोपांची निगा राखण्यासाठी देतात. इको मिशनसाठी ते पगाराचा 40 टक्के भाग खर्च करतात. बसमधील प्रवाशांच्या हाती निसर्गाचं हे धन देताना त्यांच्या चेहऱयावरचं हसू ही मोठी पुंजी असल्याचे योगनाथन समजतात.

योगीनाथन यांनी 3743 विद्यापीठ, कॉलेज, शाळांमध्ये पर्यावरणविषयक जागृती केली आहे. त्यांनी रोपं लावण्याबरोबरच वन्य जिवांच्या बचावासाठी काम केले. योगीनाथन मूळचे नागपट्टीणमच्या मइलादुथुरईचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण निलगिरी जिह्यातील कोटागिरी येथे झाले. तिथे त्यांची आई चहाच्या मळ्यात काम करायची. तिथल्या मळ्यात योगीनाथन भटकायचे तसेच 13 किमी दूर जंगलात फिरायचे. त्यामुळे लहानपणी त्यांच्यात निसर्गाची आवड निर्माण झाली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर योगीनाथन यांनी निलिगरी जिह्यात सेल्समन म्हणून नोकरी केली. तेव्हापासून पर्यावरणाशी असलेली त्यांची जवळीक अधिक घट्ट झाली.

योगीनाथन यांना 2018 साली उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘इको वॉरियर’ पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना तामीळनाडू सरकारनेही सन्मानित केले होते.

मी दिवसाला 10 रोपांचं वाटप करतो. अभिनेते रजनीकांत यांनी माझ्या मोहिमेत सहभागी व्हावे. मला मदत करावी. त्यांच्यामुळे माझे माझ्या मोहिमेला बळ मिळेल. कारण रजनीकांत हेदेखील बस कंडक्टर होते, असे योगीनाथन यांनी म्हटले आहे.