
अभिनेत्री मनवा नाईक हिच्यासोबत गैरवर्तन करणाऱया 24 वर्षीय कॅब चालकाला बीकेसी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. मोहम्मद मुराद आझम अली असे या चालकाचे नाव असून तो ऍन्टॉप हिल येथील रहिवासी आहे. आरोपी कॅब चालकाची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. शनिवारी सायंकाळी प्रवासादरम्यान कॅब चालकाने केलेल्या गैरवर्तनाविरोधात मनवा नाईक हिने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मनवाच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी कॅब चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणात पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
























































