मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी सरकारवर दबाव आणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

येणपे येथील मराठा समाजातील महिलेवरील अत्याचारातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारला विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणुन सरकारवर दबाव आणावा, यासह अन्य मागण्यांचे साकडे मराठा समाजाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना घालण्यात आले. त्यावर खासदार चव्हाण यांनी त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेत्यांनी जेष्‍ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी आज अभिवादन केले. त्यानंतर मराठा समाजाच्यावतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आमदार विश्‍वजीत कदम, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, सचिन सावंत, धैर्यशील कदम, डी. पी. सावंत, मनोहर शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र माने, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

निवेदनात म्हटल्यानुसार, गेली २ वर्षे मराठा समाज विविध आंदोलने करत आहे. मराठा समाजाबद्दल कळवळा असल्याचा आव आणत काँग्रेस पक्षाचे आमदार रस्त्यावर दिसले. मात्र आमदारांचा संवैधानीक अधिकार असलेल्या विधीमंडळात याविषयी त्यांनी कधीही आवाज उठवला गेला नाही किंवा मराठा आरक्षण कशा पध्दतीने सोडवणार याबद्दल सरकारला कोणतीही कृती करायला भाग पाडले नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजनेत ५० टक्के फी सवलतीची घोषणा करणाऱ्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात ११ टक्के फी सवलत दिल्याचा देखावा केला. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत वसतिगृह भत्ता कमी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेत शासन पत हमी घेणार ही फसवी घोषणा केली पण अंमलबजावणी शून्यच झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारला विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणुन सरकारवर दबाव आणावा, मराठा समाजाच्यावतीने येणपे येथील मराठा समाजातील महिलेवरील आत्याचारीत्यांना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जेष्ठ विविध अॅड. उज्वल निकम यांच्यासारख्यां वकीलांच्या या प्रकरणी नियुक्ती करावी. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार चव्हाण यांनी त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी दिले.