
ग्राहक बनून आलेल्या तीन भामट्यांनी सोनाराला ७० लाखांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. किसनसिंह सुदाना असे फसवणूक झालेल्या सोनाराचे नाव आहे. याप्रकरणी शबिना खान, इम्रान खान आणि वल्ली जैस्वाल या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगरमध्ये राहणारे किसनसिंग सुदाना यांचे गोळवली-दावडी येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शबिना खान, इम्रान खान, वल्ली जैस्वाल या तिघांनी त्यांच्या दुकानातून अनेक दागिने खरेदी केले. त्यामुळे किसनसिंह यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी ५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर यादरम्यान १७० ग्रॅम, ३०१ ग्रॅम, २६० ग्रॅम, १५७ ग्रॅम आणि ५५० ग्रॅम असे एकूण १ हजार ४३८ ग्रॅमचे सोने घेतले. पैसे नंतर देतो असे सांगून ते वेळोवेळी टाळत होते. दोन महिने उलटले तरी पैसे न दिल्याने त्यांनी तिघांकडे तगादा लावला. तरीही त्यांनी पैसे दिले नाहीत. अखेर सोनार पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी गेला. त्यावेळे पैसे मागायला येऊ नका, दोन दिवसात देतो असे सांगून शिवीगाळ केली.



























































