
हिंदुस्थान-श्रीलंका येथे आगामी वर्षी होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ दुसऱ्यांदा पात्र ठरलाय. या स्पर्धेचे तिकीट मिळविणारा कॅनडा हा 13 वा संघ आहे. अमेरिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॅनडाने आयर्लंडचा पराभव केला होता.
कॅनडाने अमेरिकन पात्रता फेरीत बहामासचा पराभव करून टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले. सलग पाच विजयांसह कॅनडाने ही पात्रता मिळविली. कॅनडाने बहामासचा 19.5 षटकांत अवघ्या 57 धावांत खुर्दा उडविला. कॅनडाने 5.3 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 61 धावा करीत एका रुबाबदार विजयासह टी-20 वर्ल्ड कपची पात्रता मिळविली. यजमान हिंदुस्थान व श्रीलंका यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड व पाकिस्तान या देशांनी आधीच टी-20 वर्ल्ड कपची पात्रता मिळविलेली आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. म्हणजेच अजून सात संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या सात संघांपैकी दोन युरोपियन पात्रता फेरीतून (5 ते 11 जुलै), दोन आफ्रिकन पात्रता फेरीतून (19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर) आणि तीन आशियाई पात्रता फेरीतून (1 ते 17 ऑक्टोबर) आगामी टी-20 वर्ल्ड कपचा 20 संघाचा कोटा पूर्ण करतील.