कॅनडाने हिंदुस्थानला मानवाधिकार, कायद्याची आठवण करून दिली; जस्टीन ट्रुडो यांनी मोदींचे अभिनंदन करताना लगावला टोला

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी हिंदुस्थानला मानवाधिकार आणि कायद्याच्या राज्याची आठवण करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक्सवरून अभिनंदन करतानाच जोरदार टोलाही लगावला आहे. हिंदुस्थानसोबत मानवाधिकार, विविधता आणि कायद्याच्या आधारावर दोन्ही देशांतील संबंध पुढे वाढवण्यासाठी आपले सरकार तयार आहे असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. यावर मोदी यांनीही आभार मानत आपापसातील समजुतदारपणा आणि एकमेकांप्रती असलेल्या चिंतांचा सन्मान करत  काम करण्यास तयार असल्याचे उत्तर दिले.

ट्रुडो यांनी चार दिवसांपूर्वी मोदी यांचे अभिनंदन करणारा संदेश पाठवला. त्याला मोदी यांनी आज उत्तर दिले. यावरून हरदीप सिंग निज्जर प्रकरणावरून दोन्ही देशांतील संबंध अद्याप ताणलेलेच असल्याचे उघड झाले आहे. कॅनडाने आरोप केल्यानंतर हिंदुस्थाननेही कॅनडाच्या तब्बल 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना तत्काळ देश सोडण्यास सांगितले होते. तर कॅनडानेही हिंदुस्थानचे हे पाऊल म्हणजे व्हीएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.