कॅन्सरविरोधातील लढाईचे छोटे जवान, केस दान करून मुलं देताहेत माणुसकीची शिकवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मुलगा रायन याने आपले केस कॅन्सर रुग्णांसाठी दान केले होते. रायनप्रमाणेच अनेक मुले कॅन्सरशी झुंजणाऱया रुग्णांसाठी केस दान करून मानवतेचा धडा देत आहेत. यामध्ये अगदी एक-दोन वर्षांच्या बाळापासून 12 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे.

कॅन्सरविरोधातील लढाईत अनेक मोठय़ा संस्था, व्यक्ती काम करतात. या लढाईत सहभागी होत कॅन्सरग्रस्तांसाठी आपली चिमुकली ओंजळ रिती करण्याचे कौतुकास्पद काम अनेक चिमुरडय़ांनीही केले आहे. या मुलांनी कॅन्सरच्या रुग्णांना विग बनवण्यासाठी आपले केस दान दिले आहेत. देशातील सगळ्यात छोटय़ा हेअर डोनरचे नाव आहे दीपिका स्माईल. दीपिका जेव्हा 13 महिन्यांची होती तेव्हा तिची आई जेमिमा यांनी दीपिकाचे केस कॅन्सर रुग्णांसाठी दान केले.  शाळेत मुख्याध्यापक असलेल्या जेमिमा  सांगतात, आमच्या नातेवाईकाच्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले. या घटनेने आम्ही हादरलो. त्यानंतर दीपिकाच्या पहिल्या वाढदिवसानंतर काही महिन्यांतच आम्ही केस दान केले. माझी मुलगी सर्वात लहान हेअर डोनर असल्याचा मला अभिमान वाटतो.

देशात अनेक लहान मुले कॅन्सर आजाराशी झुंजत आहेत. इंडिया कॅन्सर सोसायटीच्या एका अहवालानुसार, हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 50 हजार मुलांना कॅन्सर होतो. हैदराबाद येथे हेअर डोनेशन चळवळीत काम करणारे डी. उदय कुमार सांगतात, दान म्हणून मिळालेले केस दर महिन्याला चेन्नईच्या अडियार कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये जमा करतो. कॅन्सरविरोधातील लढाईत छोटय़ा जवानांचा मोलाचा वाटा आहे. इतरांच्या चेहऱयावर हास्य फुलवण्याची शिकवण ही मुले देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

तामीळनाडू येथील 9 वर्षांच्या मौना हिनेदेखील आपले लांबसडक केस दान देण्यासाठी कापले. केस दान करण्यासाठी केसांची लांबी सुमारे 12 इंच असावी लागते. केवळ मुलीच नव्हे, तर मुलेही केस दान करतात. त्यासाठी आवश्यक लांबीचे केस वाढवतात. दुबईत राहणारा तक्ष जैन याने वयाच्या 2 वर्षे 11 महिन्यांचा असताना हेअर डोनेट केले. त्यासाठी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर तक्षने 16  इंच लांबीचे केस कापले.

सप्टेंबर 2021 मध्ये दुबईत हेअर फॉर होम फाऊंडेशन- इंडियाने आयोजित केलेल्या मोहिमेत 28 मुले आणि किशोरवयीन मुलांनी कॅन्सर रुग्णांच्या विगसाठी केस दान केले.

तामीळनाडूची हेअर क्राऊन ही संस्था कॅन्सर रुग्णांसाठी मोफत विग बनवते. या संस्थेचे संस्थापक राम आर्षित यांनी सांगितले, दरवर्षी साधारण 100 मुलांनी दान केलेले केस आमच्या संस्थेत जमा होतात.  त्यातून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱयातील रुग्णांसाठी विगची मागणी पूर्ण केली जाते. राम आर्षित यांनी स्वतः दोनवेळा केस दान केले आहेत.