हिंगोलीत माने-घुगे यांची माघार; वसमतला अ‍ॅड. जाधवांची बंडखोरी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार शिवाजी माने आणि माजी आमदार गजानन घुगे यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवरी अर्ज मागे घेतले आहेत. युतीधर्म पाळत माने व घुगे यांनी शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर वसमत विधानसभा क्षेत्रात भाजपचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी महायुतीशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

हिंगोली जिल्ह्यात माजी खासदार शिवाजी माने व माजी आमदार गजानन घुगे हे राजकारणातले वजनदार नेते आहेत. कुणाला पाडायचे अथवा निवडुण आणायचे एवढी ताकद या दोघांनीही कळमनुरीत निर्माण केली आहे. माने व घुगे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. शिवसेनेमुळे माने दोन वेळा खासदार तर घुगे दोन वेळा आमदार झाले. माने यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी मार्गे भाजपात तर घुगे यांनी शिवसेनेतुन 2 वर्षापुर्वी भाजपात प्रवेश केला. कळमनुरी विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्याची या दोघांनीही तयारी केली होती. मात्र, शिवसेना-भाजपा महायुतीमध्ये कळमनुरीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कळमनुरीतुन जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना उमेदवारी दिली आहे. 4 ऑक्टोबर रोजी माजी खासदार शिवाजी माने व माजी आमदार गजानन घुगे या दोघांनीही अपक्ष व भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपाचा एबी फॉर्म नसल्यामुळे घुगे व माने यांचे अर्ज छाननीत बाद झाले. मात्र, अपक्ष म्हणुन दाखल केलेले दोघांचेही अर्ज वैध ठरले.  माने व घुगे यांनी भाजपा श्रेष्ठींच्या सुचनेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार व शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. जयप्रकाश मुंदडा हे रिंगणात आहेत. मात्र, भाजपच्या अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत महायुतीविरुध्द उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.