मानसिकता कधी बदलणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कॅप्टन स्मिता गायकवाड

निर्भया, हैदराबाद, उन्नाव, अरुणा शानबाग या  हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना. बलात्काराच्या घटनांवर आपण राग, संताप व्यक्त करतो. निषेध करतो. हळहळतो. पण ही संवेदनशीलता फक्त भावनिक स्तरावरच थांबते. समाज म्हणून मानसिकता बदलायला अजूनही आपण तयार नाही. कायदा गुन्हा केल्यानंतर शिक्षा देतोच पण गुन्हा होऊच नये म्हणून आपण काय करतो, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.

बलात्कार म्हणजे स्त्रियांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारं, तिच्या मनाविरुद्ध लैंगिक संबंध तिच्यावर थोपवणारं, तिच्यावर शारीरिक आणि मानसिक हल्ला करणारं कृत्य! दुर्दैवानं आजही बलात्कार झाल्यावर केवळ शील आणि चारित्र्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जातं. बलात्कारामुळे स्त्रियांच्या प्रतिष्ठा मलिन होते आणि ‘Save my dignity’ सारखे हॅशटॅग चालतात. तेव्हा प्रश्न पडतो, जर एखाद्या अवयवात स्त्रियांची प्रतिष्ठा असेल तर तीच गोष्ट पुरुषांच्या बाबतीत का लागू होत नाही?

बलात्काराची कारणं प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीनुसार, मानसिकतेनुसार  अनुभवानुसार किंवा ऐकीव गोष्टींवर ठरवत असते. निर्भया, हैदराबाद, उन्नाव, विशाखा, अरुणा शानबाग अशा कितीतरी हृदय पिळवटून टाकणाऱया घटना या जगासमोर आलेल्या. अनेक अशा घटना असतात ज्या कधीच जगासमोर येत नाहीत. न्याय किंवा सहानुभूतीसुद्धा त्यांच्या नशिबी नसते. घटना घडतात. आपण सगळे राग व्यक्त करतो. हळहळतो. व्यक्त होतो. समित्या बसतात. न्यायालयं निकाल देतात आणि तरीही हे सगळं पुन्हा पुनः होत राहतं. आधी बलात्कार व्हायचे. आता बलात्कार करून मारून टाकणे हे प्रकार सर्रास होतायत.

बलात्काराच्या बातम्यांबद्दल संताप, निराशा, निषेध हे सगळं व्यक्त करणं अगदी योग्य आहे. संवेदनशील समाजाचं ते लक्षण आहे. पण आपली संवेदनशीलता फक्त भावनिक स्तरावरच थांबते म्हणून या घटना घडत राहतात. समाज म्हणून मानसिकता बदलायला आपण आजही तयार नाही म्हणून या घटना घडतात. Gender Neutrality फारच दूरची गोष्ट, आपण लिंग समानता पण आचरणात आणत नाही. लैंगिक अत्याचारांनासुद्धा आपला समाज स्त्र्ायांना जबाबदार धरतो, जातीय, धार्मिक रंग देतो. राजकीय नेतृत्व अशा घटनांचंसुद्धा राजकारण करतात.

मध्यंतरी क्ष्सूदद चळवळ जेव्हा जगभर पसरली होती आणि हिंदुस्थानातही त्याचे पडसाद दिसले तेव्हा केवळ स्त्रियांच नाही तर अनेक पुरुष आणि तृतीयपंथीसुद्धा लहानपणी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल व्यक्त झाले. लैगिक अत्याचार ही एक विकृती आहे. जी आपल्यापेक्षा दुर्बल समजल्या जाणाऱया कोणावरही आजमावली जाते. मानसिक असंतुलन, ड्रग्स किंवा दारू इत्यादी व्यसनं, सामाजिक आणि कौटुंबिक जडणघडण इत्यादी वेगवेगळी कारणं बलात्कारासंबंधी झालेल्या संशोधनात सांगितली जातात. मानसोपचारतज्ञ आणि मानसशास्त्र्ाज्ञ त्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक प्रकाश टाकू शकतील. कायदा हा गुन्हा केल्यावर शिक्षा देतो. पण गुन्हा होऊच नये म्हणून आपण समाज म्हणून काय करतो? हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. स्त्र्ायांनी अंगभर कपडे घातल्याने, रात्री बाहेर न पडण्याने या गोष्टी बदलतील हा समज म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे आणि ही मानसिकतासुद्धा बलात्कारी पुरुषांचं मनोधैर्य वाढवायला पूरक आहे.

स्त्रिया ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कमकुवतच असते हा स्त्रिया आणि पुरुषांवर केला जाणारा सामाजिक संस्कारसुद्धा घातक आहे. कोणता तरी पुरुष 50 किमी पळू शकतो आणि कुस्ती लढतो म्हणून जगातले सगळे पुरुष सगळ्या स्त्र्ायांपेक्षा बलवान ठरत नाहीत. मुलींना कराटे आणि इतर स्वरक्षणाचे क्रीडा प्रकार शिकवले आणि आयुष्यभर त्यांना हे ऐकवत राहिलात की पुरुष स्त्रियांपेक्षा बलवान असतात तर काय उपयोग? जेव्हा खरंच स्वतःचं रक्षण करण्याची वेळ येईल तेव्हा समोरचा पुरुष आहे म्हणून तो बलवान आहे हा विचारच त्या स्त्रिला कमकुवत करेल. कोणत्याही आणीबाणीच्या वेळी भीती वाटणं साहजिक आहे. अंगाचा थरकाप होणं अशा गोष्टी स्त्री-पुरुष कोणामध्येही होऊ शकतात. मनोधैर्य खच्ची न होऊ देणं हे महत्त्वाचं. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी व्यायाम, खेळ, ट्रेकिंग, योगासनं अशा गोष्टी उपयोगी पडतात. आत्मविश्वास आणि मनोधैर्य वाढवण्याचा अजून एक उपाय म्हणजे ज्या गोष्टींची भीती वाटते अशा छोटय़ा छोटया गोष्टींची यादी करून त्या गोष्टी मुद्दाम केल्या की हळू हळू भीती मरून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. पेपर स्प्रेसारख्या गोष्टीसुद्धा डोळ्यात मारून, पेन, हेअर पिन, नखं अशा गोष्टी डोळ्यात खुपसून अशा संकटाच्या वेळी निसटता येऊ शकतं. यापैकी काहीच शक्य नसेल तर स्वतःच्या घशात हात टाकून उलटी काढणे जेणेकरून किळस वाटून समोरची व्यक्ती जवळ येणार नाही असाही एक उपाय सांगितला जातो. स्वसंरक्षणाच्या मूलभूत गोष्टी सांगणारे अनेक विडिओ यु टय़ूबवर आहेत. ते पाहून आपल्या ताकदीनुसार आपण काय करू शकतो हे प्रत्येक व्यक्ती ठरवू शकते. वेगवेगळया आणीबाणीच्या परिस्थितीत ‘तिथे तू काय केलं असतं?’ असे संवाद पालकांनी आपल्या आपत्याशी करणं हे पण एखाद्या परिस्थितीला सामोरं कसं जावं यादृष्टीने महत्त्वाचं ठरतं.

2013 च्या निर्भया केसनंतर बलात्कारासंबंधी कायदे बदलले परंतु प्रशासन, पोलीस यांच्या प्रतिसादामध्ये फरक पडलेला नाही. नुकत्याच घडलेल्या हैदराबादच्या केसमध्ये पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता ‘तुमची मुलगी पळून गेली असेल. प्रकरण आमच्या हद्दीत येत नाही,’ अशी उत्तरं मिळाल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली. यापेक्षा असंवेदनशीलता काय असू शकते? ऑक्टोबर महिन्यातील मुंबईतील ठक्कर बाप्पा कॉलनीमधली घटना ज्यामध्ये मुलीचे अपहरण झाल्याच्या वडिलांच्या तक्रारीवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही त्यामुळे पांचाराम रिठाडिया यांनी सात महिन्यांचा पाठपुरावा करून शेवटी आत्महत्या केली. अशा अनेक घटना प्रशासन आणि पोलिसव्यवस्थेतील असंवेदनशीलतेची उदाहरणं आहेत. अर्थात याला अपवाद असणारे संवेदनशील कर्मचारी पण आहेत. पण त्यांची संख्या किती ? हा प्रश्न आहे खर्च न झालेला ‘निर्भया फंड’ या विषयाबद्दल सरकार दरबारी असलेली उदासीनता पुन्हा एकदा सिद्ध करतो.

शेवटचं आणि महत्त्वाचं, मुलीचा बलात्कार होऊन जेव्हा तिचा खून केला जातो तेव्हा समाजात ज्या प्रतिक्रिया उमटतात त्यामध्ये ‘खून करणाऱयांना शिक्षा द्या’ पेक्षा ‘बलात्कार करणाऱयांना शिक्षा द्या’ असा सूर अधिक असतो. खून हा बलात्कारापेक्षा कमी गंभीर आहे का? की केवळ ती मुलगी होती म्हणून तिची लैंगिकता तिच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे? जेव्हा समाजाची ही मानसिकता बदलेल तेव्हा कदाचित बलात्कार होणं थांबेल.

– [email protected]