
सामना प्रतिनिधी । जामखेड
मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी हळगाव चौडी रोडवर चार चाकी कार अडवली आणि गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली व गाडीतील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी तीन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र उर्फ नितीन भागवत तेरकर (४३) रा. आघी ता. जामखेड हे शनिवारी जामखेड येथे मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडे ठेवलेले दीड लाख रुपये घेऊन गाडी क्रमांक एम एच ४३ आर ५७२७ या मधून जामखेडहून आघीकडे चालले होते. ही कार आघी गावच्या शिवारात हळगाव चौंडी रोडवर आली असता पाठीमागून मोटारसायकल क्रमांक एम एच १६ -९७३ या वरुन आलेले आरोपी गुलाब दादासाहेब खरात, भाऊसाहेब दादासाहेब खरात, दोघे रा. खरातवाडी, पिनु अजिनाथ मोरे रा. हळगाव हे त्या ठिकाणी आले. यावेळी तिघांनी कार चालक व ट्रक्टरवर असलेला ड्रायव्हर गुफुर लाला शेख यांना गाडीच्या खाली ओढून काठीने मारहाण केली. तसेच मुलीच्या लग्नासाठी सामान खरेदी करण्यासाठी आणलेले दीड लाख रुपये रोख व फिर्यादीच्या अंगावरील दहा ग्रॅमचे सोने असा एकूण १ लाख ८४ हजार २५४ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर तेरकर यांनी रविवारी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फैजदार चव्हाण हे करत आहेत.
































































