वेदाध्ययन करा!

 वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा. हा ठेवा जतन करण्याची आणि वेदाध्ययन, वेदसेवा आणि पौरोहित्य शिकण्याची ज्यांना आवड आहे असे विद्यार्थी वेदपाठशाळेत प्रशिक्षण घेऊ शकतात. वेदपाठशाळांमध्ये प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाचीं परंपरागत पद्धत असते. त्यानुसार शिक्षण देण्यात येते. पाठांतर आणि प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो.

वैदिक ज्ञानाचे महत्त्व, आजच्या युगातही या ज्ञानाची उपयुक्तता आणि जागतिक शांततेसाठी वेदांचे योगदान, निसर्ग आणि प्रकृतीचे महत्त्वसुद्धा आपल्याला वेदांनीच शिकविले आहे. वेदांनी दिलेली ही शाश्वत मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचं कार्य पुरोहित करत असतात. त्यामुळे समाजात नवे पुरोहित तयार होण्याकरिता ही करीअरची एक अनोखी वाट आहे.

वेदपाठ शिकवणारे गुरुजी आपल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्रांचे छोटे चरण (तुकडे) शिकवतात. याला संथा देणे असे म्हणतात. याचप्रमाणे चरणाची संथा, ऋचेची संथा, गुंडी केची संथा, अर्धनीची संथा, वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले जाते.

वेदपाठशाळेत का जावे?

बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण वेदपाठशाळेत घेता येते.यासाठी पाठशाळेत शिक्षण घेणार्‍या पुरोहितांना पौरोहित्यातील विधी कसे करावेत हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले जाते. त्यामुळे पौरोहित्य कसे करावे, धार्मिक कृतींचे महत्त्व, मुंज, लग्न, सत्यनारायण पूजा हे विधी करण्याची पद्धत प्रत्यक्ष कृतीसह समजण्यास सोपे जाते. शास्त्रशुद्ध आणि विधिवत पौरोहित्य करणार्‍या पुरोहितांची समाजाला आवश्यकता असते.  

वेदपाठशाळेची ठिकाणं

 • श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा, माधवबाग, मुंबई
 • तळपदे वेदविद्या प्रचारणी, मुंबई
 • घैसास गुरुजी वेदपाठशाळा, पुणे
 • ऋग्वेद वेदपाठशाळा, सज्जनगड
 • गणेश वेदपाठशाळा,परभणी
 • महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन 

आवश्यक गुण

 • वेद-उपनिषदांविषयी अत्यंत प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा असणारा.
 • संस्कृत भाषेवर प्रभुत्व. शास्त्रानुसार आचरण करणारा.
 • उच्चार शुद्ध अन् स्पष्ट असावेत.
 • दिनचर्येचं पालन करण्याची क्षमता.
 • उत्तम पाठांतर क्षमता असणारा.
 • पौरोहित्य, साधनेची आवड असावी.
आपली प्रतिक्रिया द्या