
लग्न ठरल्यानंतर हळदी-कुकंवाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात वरपक्षाला दीड लाख रुपयेही देण्यात आले. मात्र, वरपक्षाने तीन लाखाच्या हुड्यांची मागणी केली. हुंडा दिला नसल्याने त्यांनी ठरलेली लग्न मोडल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी ठरलेले लग्न मोडून मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी आणि हुंडा मागितल्याप्रकरणी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात माजी सैनिक चंद्रकांत राचप्पा सुतार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीचे लग्न लातूर येथील विक्रम सिध्देश्वर पांचाळ याच्यासोबत ठरले होते. 1 फेब्रुवारी 2020 रोजी उदगीर येथे वरपक्षाला त्यांना दिड लाख रुपये स्वखुशिने दिले आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. विवाहासाठी 26 एप्रिलचा मुहूर्त ठरवण्यात आला. त्यानंतर मुलाची आई जयश्री सिध्देश्वर पांचाळ,वडील सिध्देश्वर पांचाळ,त्यांची मुलगी भावना, त्यांचे जावई विरभद्र शेषेराव पांचाळ, विक्रम पांचाळ यांनी तीन लाख रुपये हुंडा मागितला. एवढा हुंडा देऊ शकत नसल्याचे सुतार यांनी त्यांना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे विवाहाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
कोरोना संकटानंतर लग्नाची तारीख ठरवण्यासाठी सुतार वरपक्षाकडे गेले होते. तेव्हा परपक्षाकडील मंडळींनी तीन लाख रुपये हुंडा दिल्यानंतरच विवाहाची तारीख काढू, पैसे दिल्याशिवाय तारीख काढणार नाही. हुंडा दिला नाही तर लग्नच मोडू असे धमकावले. तसेच शिवीगाळ करुन तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे नाही असे सांगितले. त्यानंतर अपमानित करुन घरातून हाकलून दिले. ठरलेल्या लग्नास नकार दिल्याने मुलीची बदनामी झाली. वरपक्षाने फसवणूक केली ,तसेच हुंडा मागितल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































