
देशभरात सध्या जनगणना सुरू आहे. जनगणना 2027 च्या दुसऱया टप्प्यात जातनिहाय जनगणना केली जाईल. यामध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ‘ओबीसी’च्या स्वतंत्र जनगणनेसह इतर काही महत्त्वाच्या बाबींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्यांचे पुनरावलोकन आणि आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची अचूक गणना होऊन विश्वासार्ह डेटा उपलब्ध होईल, ज्याचा मोठा फायदा ओबीसींच्या आरक्षणाच्या लाभांवर आणि भविष्यात लोककल्याणकारी धोरणे आखण्यास होणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी प्रश्न क्र. 12 मध्ये सामाजिक वर्गीकरणासाठी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर असे तीनच पर्याय ठेवण्यात आले आहेत. इतर मागासवर्गीय (ओबीसी)यांच्यासाठी स्वतंत्र रकान्याची कोणतीही तरतूद नाही. ही त्रुटी दूर करण्यात आली असून जनगणनेच्या अर्जामध्ये ‘ओबीसी’ या स्वतंत्र प्रवर्गाचा स्पष्ट समावेश करण्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

























































