Twisha Sharma : पाठवणीच्या वेळी ट्विशाच्या सासूने केलेली 2 लाख रुपयांची मागणी, FIR मधून धक्कादायक माहिती आली समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोपाळमधील ट्विशा शर्मा या नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या एफआयआर (FIR) मधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्विशाची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी लग्नानंतर ‘पाठवणी’च्या वेळी 2 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप ठेवण्यात आला आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे.

सीबीआयने २५ मे २०२६ रोजी याप्रकरणी अधिकृत एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८०(२) (हुंडाबळी), ८५ आणि ३(५) सह हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ट्विशाचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, ३३ वर्षीय ट्विशा शर्मा हिचा विवाह ९ डिसेंबर २०२५ रोजी समर्थ सिंग याच्याशी झाला होता. लग्न आटोपल्यानंतर ट्विशाची पाठवणी सुरू असताना तिची सासू गिरीबाला सिंग यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. ट्विशाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या हट्टापायी ही रक्कम दिली देखील होती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

३३ वर्षीय ट्विशा शर्मा हिचा मृतदेह भोपाळमधील तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ट्विशाच्या कुटुंबीयांनी तिचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्यावर हुंड्यासाठी छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता सीबीआय या प्रकरणातील हुंडाबळी, छळ, कट रचणे आणि इतर संभाव्य गुन्ह्यांच्या बाजू तपासून सखोल तपास करत आहे.