सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका थेट मोबाईलवर, पुढील वर्षापासून बोर्डाचा नवा नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून सीबीएसईच्या परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रति आता थेट ‘डिजीलॉकर’ द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच, बोर्डाने आपल्या ‘ओएसएम’ प्रणालीच्या अंमलबजावणीचे आणि तेलंगणा स्थित ‘कोएम्प्ट एज्यु टेक’ या कंपनीला कंत्राट देण्याच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन केले आहे.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्ता आणि खर्चावर आधारित निविदा प्रक्रियेद्वारे ही निवड झाली. या प्रक्रियेत तांत्रिक मापदंडांना 70 टक्के आणि आर्थिक निविदांना 30 टक्के महत्त्व होते. कोएम्प्ट कंपनीने करांसहित प्रति उत्तरपत्रिका अंदाजे 25.75 रुपये असा दर दिला. टीसीएसने तांत्रिकदृष्टय़ा पात्र ठरलेल्या दुसऱया कंपनीने काही प्रवर्गांसाठी करानंतर प्रति प्रत तब्बल 65 रुपयांचा दर दिला होता, जो खूप जास्त होता. कोएम्प्ट ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली. कंत्राट दिले गेले तेव्हा दोन्ही कंपन्यांकडे ‘सीएमएमआय लेव्हल 5’ हे सर्वोच्च दर्जाचे प्रमाणपत्र होते. उत्तरपत्रिकांमधील त्रुटींसाठी कंपनीवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक चुकीच्या पद्धतीने स्कॅन केलेल्या किंवा जुळत नसलेल्या उत्तरपत्रिकेसाठी 4,000 रुपये दंड तर अर्धवट स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी 8,000 रुपये दंड आणि पूर्णपणे स्कॅन न केलेल्या उत्तरपत्रिकेसाठी 15,000 रुपये दंड याप्रमाणे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर करारातील अटींनुसार दंड आकारला जाईल.