
अदिती सारंगधर,[email protected]
सिद्धार्थ चांदेकर. डोरा त्यांची लाडकी लेक… त्याची आवडची स्वीट डिश म्हणजे डोराच्या हजार पाप्या….
गेले काही आठवडे मी हा प्रवास करतेय. अनेक मित्रमैत्रिणींना कधी प्रत्यक्ष भेटून, कधी फोनवर त्यांच्या जिवलगांबद्दल विचारतेय… आणि तुमच्यापर्यंत तुमच्या आवडत्या कलाकाराचं एक वेगळं रूप पोहोचवायचा प्रयत्न करतेय… माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर मी जेव्हा विचारलं की, कुणाच्या पेटबद्दल तुम्हाला वाचायला आवडेल? अर्थात तुमची सजेशन्स तर ८० टक्के लोकांनी मला ‘सिद्धार्थ चांदेकर’ सांगितलं… खरं तर तोपर्यंत सिद्धार्थकडे पेट आहे हे मला माहितीही नव्हतं.
पण सिद्धार्थला फोन लावला आणि ‘चल ना आजच बोलूया’ अशी उत्साहवर्धक वाक्य समोरून आल्यावर बरं वाटलं. एव्हाना लक्षात आलंय ‘बोलू गं… करू गं’ करणारी मंडळी काही विशेष प्रेमाने त्यांच्या बेबीज्कडे लक्ष देत नाहीत… त्यांच्यासाठी फक्त ते पेट्स असतात, पण सिद्धार्थचे सोशल मीडियावरचे फोटोज् बघून असं वाटलं की… ‘तू आहेस म्हणून मी मज्जेत आहे… थँक यू…’
रणांगण, क्लासमेट्स, झेंडा, वजनदार, सतरंगी रे अशा अनेक चित्रपटांतून जो बॉय नेक्स्ट डोअर आपल्याला भावला आणि आपला झाला… तो आहे डोराचा फादर हॅण्डसम.
खरं तर लहानपणी आमच्या काकांकडे कुत्रा होता. त्यामुळे छोटू बेबी ते मोठा डॉगी इतका प्रवास पाहिला होता, पण आपलं असं पेट घरी असावं असं तेव्हापासून वाटायचं… पण आई सक्त विरोधात… तिला सगळं टापटीप, नीटनेटकं लागतं… ते काही पेट आल्यावर राहणार नाही आणि मी काही एक्स्ट्रा एफोर्टस् घेऊन तिची स्वच्छता मोहीम पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे तिला कन्वीन्स करता करता ते राहिलंच.
आता शूटिंग्ज, नाटकं या कारणाने मुंबईत आलो… आणि बऱयाचशा मित्रमंडळींकडचे पेटस् बघून अजूनच वाटायला लागलं, असावं या घरात कुणीतरी… आपल्याला जमेल का? येईल का? झेपेल का? पेटला न्याय देऊ शकू का? खूप प्रश्न पडले डोक्यात… पण त्याला उत्तर शोधायचा अवधीही न देता डोरा आली… मिताली आली आणि तिच्याबरोबर डोरा आलाच… आणि माझी जीवनशैलीच बदलली.
मला लहानपणापासूनच डॉग्सची खूपच आवड… पण पुन्हा आईबाबा नको म्हणाले… अखेरीस मला डोरा गिफ्ट मिळाली तेव्हा त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. मिताली खूपच उत्साहात सांगत होती. ‘डोरा घरी आली तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं… येतच नव्हतं. त्यामुळे चिडचिड, इरिटेटेड, फ्रस्टेटेड झोनमध्ये मी होते… पण ती आल्याने सगळं लक्ष, मन डायव्हर्ट झालं आणि चिडचिड गो, गॉन, गेली… गेलीच. मला खूप शांत केलं तिनं… माझ्या जबाबदाऱया अचानक वाढल्या. त्यामुळे सॅड होऊन बसायला वेळ नाही मिळाला… आणि माझ्या लक चार्मबरोबर खूप कामसुद्धा आलं. मी आणि सिद्धार्थ एकत्र राहायला लागल्यावर ऑफकोर्स डोरासुद्धा आलीच माझी करवली म्हणून…
पेट आलं ना घरी की तुमचं आयुष्य त्याच्याभोवती फिरतं आणि ऍडजस्टमेंट्स पण त्याच्या सोयीने… लुक टेस्ट्स, ऑडिशन्स, मीटिंग्स, शूटिंग्स, प्रयोग सगळं करत असताना दोघांपैकी कुणीतरी एक डोराजवळ असेल याची काळजी घेतोच… अगदीच नाही तर अतिलाड करून घ्यायला तिची रवानगी आज्जी आजोबांकडे होते…
सकाळी लवकर उठून… खरं तर पंजा मारून, अंगावर उडय़ा मारून तीच मला उठवते… कारण मिताली उठणारच नाही लवकर हा विश्वास तिला असतो… सो मी (सिद्धार्थ) तिला वॉकला नेतो… आणि तो अर्धा तास माझ्या दिवसातला सगळ्यात एनर्जेटिक, उत्साहवर्धक अर्धा तास असतो… तिच्याबरोबर फिरणं, खरं तर मी तिला नाही ती मला (खेचत) फिरायला नेते… आहाहा… प्रातर्विधी आटोपले तिचे की प्रीटी वुमनसारखी मूठभर मांस अंगावर चढवून… बाकीच्या वा आजूबाजूच्या कुत्र्यांना ऍटिटय़ूड देत आमचा डेरोबा झुलत झुलत चालत असतो… आणि रात्रीच्या वॉकला तर लिश-बिश काही नाही… लिफ्टमधून उतरलं की काळोखात धूम ठोकतात… मग सोसायटीच्या आवारात रोज आमच्या तिघांचा एक लपाछपीचा डाव रंगतो… हिला जाऊन शोधेपर्यंत जी वाट लागते… आणि सापडली की परत गायब… झोप येईपर्यंत दमलो की फक्त ‘चला घरी डोरा’ म्हणायचं… मग मात्र आमची गुड गर्ल धापा टाकत टाकत… कसं पिदवलंच्या विजयाचा मुकूट घालून, कुले हलवत लिफ्टपाशी येऊन बसणार. चकाकत्या डाळय़ांतून मिश्किल हसणार, घरी जाऊन पोटभर पाणी पिणार आणि आमच्या आधी धावत जाऊन बेडवर गार… आणि तिला कुशीत घेऊन झोपायची मज्जा… नाही नाही… शब्दात कसं सांगायचं…
डोराला आमच्या खायला देवा रे… तिचं जेवण सोडून सगळं आवडतं… शाळेत कसं मुलं आपला डबा तसाच घरी परत आणतात, पण दुसऱयांच्या डब्यावर ताव… एकदम तस्संच… पण अलाऊड नसल्याने आम्ही स्ट्रिक्टली ती बंधनं पाळतो… डॉग फूड… भात, चिकन, दही अशा बेसिक पदार्थांना मेजवानी समजून तिला समाधान मानावं लागतं. मग कधी कधी अंडही देतो… पण डांबरटचा आगाऊपणा एवढा की स्वतःहून हाताने नाही खाणार… भरवायचं हिला… मग एक घास भरवून थोडा इगो पॅम्पर केला की मग चटाचटा फस्त… म्हणजे जर जेवण घेऊन आम्ही बराच वेळ बाहेर गेलो तरी येईपर्यंत खाल्लेलं नसतं तिने… आणि आल्यावर तिचे बोलके डोळे हळूच त्या जेवणाकडे बघतात… तिला या बारीक बारीक गोष्टी टिपता येतात ना… याला पेट असण्यातली खरी मज्जा कळते… आणि आपलं असेपर्यंत कळत नाही… आमची स्वीट डिश म्हणजे साधारण रोजच्या डोराच्या घेतलेल्या हजार… अतिशयोक्ती नाही हां… हजार पप्प्या…
व्हॅनिला आईक्रीम हा विशेष जवळीकीचा आणि जिव्हाळय़ाचा विषय… वीक पॉइंट तिचा… आणि आमचं अस्त्र… डोरा एखादी गोष्ट ऐकेनाशी झाली की ‘चला व्हॅनिला आईक्रीम खाऊया’ एवढं म्हणायचं की काम होतं… पूर्वी आंघोळ हा एक टास्क असायचा, पण बाथरूममध्ये व्हॅनिला घेऊन गेलं की जमेल त्या वेगाने गुपचूप आंघोळीला यायची… आता मात्र तिच्या लक्षात आलंय आंघोळ म्हणजे बेमुदत मसाज, गरमागरम पाणी, स्वच्छ अंग… त्यामुळे बाथरूममध्ये गेली की पडून राहते. तुम्ही किती वेळ घालताय ती घाला आंघोल… आंघोळ झाली तरी बाहेर येत नाही. मग आता बाहेर आणायला पुन्हा व्हॅनिला द्यावं लागतं… मिताली हसत हसत सांगत होती.
तिला माझं अक्चुअली आमचं सगळं बोलणं, वागणं कळतं… एरव्ही दारातून आत येताच अंगावर पडेपर्यंत उडय़ा मारणारी डोरा त्या दिवशी मी आल्यावर हळूच जवळ आली. अजिबात मस्ती न करता हळूच पाय चाटला आणि बाजूला येऊन बसली होती. जणू तिच्या नावाचा मी पायावर केलेला टॅटू तिला कळला होता. अग्गं… तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी खास डॉग केक (गाजराचा) करून घेतला. त्यावर मेणबत्ती लावली. आम्ही दोघं आणि मित्रमंडळी वाट बघतोय ही येईल आणि केक उडवेल म्हणजे फस्त करेल… पण ही कोपऱयात उभी… मेणबत्ती संपत आली तरी येईना. शेवटी वैतागून मी ती फूक मारून विझवली. डोळय़ांची पापणी उघडेपर्यंत केक फस्त… मेणबत्तीला घाबरली होती गं… हळूहळू असं तिला हवं नको असणारं आम्हाला कळतं… कधी अपेक्षित कधी अनपेक्षित सरप्राईज. एकदा दरवाजा उघडा राहिला तर ही गायब… शोधून दमलो तरी मिळेना… आमचं घर तळमजल्यावर बिल्डिंगच्या आवारात मागे मोठ्ठं झाड आहे… हाक मारल्यावर ‘काय यार माझी झोप मोडलीत’ असं रागानं बघत घरात आली. गमतीशीर प्रकरण आहे सगळं…
आजसुद्धा बघ ‘हाईक’ला जाऊया म्हटलं की दारात जाऊन बसलीय… थेऊरच्या टेकडीवर चढायला, फिरायला, भिजायला अत्यंत आवडतं तिला. आता मस्त पेडीग्रीची ग्रेव्ही तिला खायला घालतो… सॅक खांद्यावर अडकवतो… गाडी काढतो… आणि शूटिंग नसल्याचा सुप्पर फायदा घेऊन आमच्या ऍडोरेबल डोराबरोबर थेऊरला जातो… खरंच मिताली आणि सिद्धार्थशी गप्पा मारताना राहून राहून वाटत होतं की त्यांचं नातं घट्ट होण्यासाठीचा एक धागा किंवा दुवा जो हवा असतो तो डोरा आहे… आणि असेल… मंमम फस्त करून धावत बाई आल्या बाबाच्या मांडीवर (ड्रायव्हिंग सीटवर) उडी मारून बसल्या.
रेडी, गेट, सेट, गो…!!!
























































