केंद्राच्या 45 वर्षांपुढील सर्व कर्मचाऱ्यांना लस घेण्याच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या 45 वर्षांपुढील सर्व कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्यात हयगय करू नका, असे केंद्राच्या मनुष्यबळ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱयांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

मनुष्यबळ मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱयांसाठी विविध सूचना केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग तातडीने आणि प्रभावीपणे रोखण्यासाठी 45 वर्षांपुढील सर्व कर्मचाऱयांनी वेळीच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सरकार कोरोना संसर्गाच्या स्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. याच दृष्टिकोनातून सरकारने लसीकरणासाठी गट निश्चित केले आहे. सध्या 45 वर्षे व त्यापुढील वयोगटातील सर्व नागरिक लस घेऊ शकतात. संबंधित वयोगटातील सर्व कर्मचाऱयांनी लस घ्यावी. तसेच ही लस घेतल्यानंतरही सतत हात धुणे, सॅनिटायझेशन, मास्क किंवा फेस कव्हर लावणे, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचेही पालन करा, असे मनुष्यबळ मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि खात्यांना हा आदेश जारी करण्यात केला आहे.