
देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच असे अहंकारी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला गेले 39 दिवस आपल्या न्याय्य मागण्यांसाठी हाडे गोठवणाऱया थंडीत भररस्त्यावर आंदोलन करणाऱया देशाच्या अन्नदात्याचे दुःख दिसत नाही काय, असा सवाल विचारत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, केंद्राने आपला अहंकार सोडून अन्यायकारक कृषी कायदे तत्काळ मागे घ्यायला हवेत. लोकशाहीत अहंकार फार काळ टिकत नाही, असा टोला केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.
लोकशाहीत जनमताची उपेक्षा करणारे सरकार आणि त्यांचे नेते फार काळ सत्तेवर राहू शकत नाहीत. शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रातील भाजप सरकारचे ‘थकावो आणि भगावो’ धोरण आता स्पष्ट दिसू लागले आहे, असे टीकास्त्र सोडून सोनिया गांधी म्हणाल्या, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आता अहंकार सोडावा आणि थंडीत आपले प्राण गमावणाऱया शेतकरी आंदोलकांची कदर करावी. अन्याय्य कृषी कायदे मागे घेणे हाच आता राजधर्म आणि आंदोलनात हक्कांसाठी शहीद झालेल्या आंदोलकांना खरी श्रद्धांजली ठरेल. सामान्य जनता आणि शेतकरी हा देश विकासाचा कणा आहे. त्यांच्या हक्काचे आणि हिताचे रक्षण करणे हीच खरी लोकशाही ठरेल याचे भान मोदी सरकारने ठेवायला हवे.
मूठभर उद्योगपतींचे हित हा केंद्राचा अजेंडा आहे का?
दिल्लीतील हाडे गोठवणाऱया थंडीत आणि पावसात शेतकरी 39 दिवस न्यायासाठी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. त्यातील 54 शेतकऱयांनी आंदोलनादरम्यान आपले प्राणही गमावले आहेत. अनेकांनी आत्महत्येचाही मार्ग स्वीकारला आहे. पण निर्दयी मोदी सरकारच्या एकाही मंत्र्याने अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहीद शेतकऱयांसाठी सांत्वनाचा एका शब्दही काढला नाही. आंदोलनकारी अन्नदात्याची ही केविलवाणी अवस्था पाहून मलाही अतिशय दुःख झाले आहे. देशातील मूठभर उद्योगपतींचे हित साधण्यासाठी आणि त्यांच्या लाभासाठी अन्नदात्याला वाऱयावर सोडायचे हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.



























































