
अनेक जोडप्यांना आई-वडील बनण्याचं सुख लाभत नाही. त्यासाठी अनेक मार्ग असतात. त्यात एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे डोनर्स. निरोगी पुरुषाचे शुक्रजंतू किंवा निरोगी स्त्रीची बिजं यांचा साठा करून तो गरजू जोडप्यांना देण्यात येतो. मात्र, अशा जोडप्यांना जर सरोगसीच्या माध्यमातून बाळ हवं असेल तर डोनर्सची मदत घेता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. डोनर्सच्या शुक्रजंतू किंवा बीजातून जर सरोगेट मदरला गर्भधारणा केली गेली तर आई-बाबांसोबत त्या मुलाचा मजबूत भावनिक बंध असणार नाही, याची शक्यता दाट आहे. त्यामुळे डोनर्स गेमेट्सचा उपयोग सरोगसीसाठी वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असं केंद्राने न्यायालयात म्हटलं आहे.
तसंच, जर या गॅमेट देणाऱ्यापैकी एखादा मृत पावला किंवा दांपत्याचा घटस्फोट झाला तर परिस्थिती बिघडू शकते. तसंच यातून कोणाचंही शोषण होऊ नये, यासाठी ही परवानगी देऊ नये, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.




























































