गडकरींना भोवळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, राहुरी

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात दीक्षान्त भाषणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवरच भोवळ आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी तसेच उपस्थित मंत्री, आमदारांनी त्यांना सावरले. तातडीने दाखल झालेल्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. आता गडकरी यांची  प्रकृती ठणठणीत आहे.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला नितीन गडकरी आले होते. त्यांचे भाषण झाल्यावर राष्ट्रगीत सुरू झाले. त्याच वेळी त्यांना भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत गडकरी सावरले होते.

तपासणीनंतर ते स्वतःच चालत स्टेजवरून उतरून वाहनात बसले. तेथून ते कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसवर गेले. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. नंतर जेवण झाल्यावर तासभर त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर गडकरी आणि राज्यपाल विद्यासागर राव एकाच हेलिकॉप्टरने शिर्डीला गेले. तेथून गडकरी नागपूरकडे तर राज्यपाल मुंबईकडे रवाना झाले.

मी ठणठणीत!

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी घातलेला कॉन्व्होकेशन गाऊन आणि बंदिस्त सभागृहामुळे आपल्याला गुदमरल्यासारखे झाले. त्यामुळेच भोवळ आली. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली. ब्लडशुगर आणि ब्लडप्रेशर सर्व ठीक आहे. माझी प्रकृती चांगली असून मी ठणठणीत आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कष्ट कमी करा; पवारांचा सल्ला

नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची घटना राहुरीत घडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी गडकरींना कष्ट कमी करण्याचा आपुलकीचा सल्ला दिला. शरद पवार यांनी ट्विट केले आहे. तुम्ही जास्त काम करीत आहात, मात्र त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. गडकरी, काळजी घ्या असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच ठणठणीत प्रकृतीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.