
मुंबईची जीवनवाहिनी असणाऱया लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा मान्सून प्रवास आता विनाब्रेक होणार आहे. मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या 15 स्थानकांत येणाऱया बंदिस्त नाल्यां (कल्व्हर्ट)ची साफसफाई विक्रमी अशा 15 दिवसांत करून मुसळधार पावसातही रुळांवर पाणी साचणार नाही याची काळजी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड स्थानकांच्या रुळांखाली हे बंदिस्त नाले आहेत.
मुंबईत नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छता करण्याची कामे प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका करते. त्याचप्रमाणे तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोहमार्गांवरील स्वच्छतेची तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱया नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते रुळांवर येऊ नये यासाठी ही स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोहमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकांदरम्यान एकूण 18 ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने तेथील गाळ काढावा, अशी विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने महापालिका प्रशासनाला पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत केली. त्यामुळे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता एल. कमलापूरकर, उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे, सहाय्यक अभियंता राजेश यादव आणि सहकारी अधिकारी व कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले.
या ठिकाणी काम सुरू’
विद्याविहार ते घाटकोपरदरम्यान जॉली जिमखानालगत, विक्रोळी ते कांजूरमार्गदरम्यान विक्रोळी स्थानकाजवळ आणि कांजूरमार्ग ते भांडुपदरम्यान दातार नाला या तीन बंदिस्त प्रवाह मार्गाच्या ठिकाणी संयंत्र पोहोचू शकत नसल्याने तेथील रेल्वे रुळाखालून प्रवाह मार्ग स्वच्छतेचे काम रेल्वे प्रशासन स्वतŠ करत आहेत.
आव्हानात्मक काम
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे 116 कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर 41, मध्य रेल्वे मार्गावर 53 आणि हार्बर रेल्वे मार्गावर 22 कल्व्हर्ट आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छता करणे आव्हानात्मक असते.
या स्थानकांतील नाले झाले गाळमुक्त
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानकदरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळीदरम्यान गोदरेज गॅस पंपनीजवळ, करी रोड ते परळदरम्यान, परळ ते दादरदरम्यान जगन्नाथ भातणकर पुलाखाली, दादर ते माटुंगादरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान, शीव ते कुर्लादरम्यान, कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहुरदरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणेदरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला या ठिकाणचा गाळ काढण्यात आला.

























































